हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 10:38 IST2025-11-09T10:38:08+5:302025-11-09T10:38:08+5:30
बनारसी लालने त्याचा साथीदार आशिक अली याच्यासोबत मिळून हरिशची हत्या केली होती. त्यानंतर या दोघांनी मिळून मृतदेहाचे धड आणि शीर वेगवेगळे करून तिथून फरार झाले होते.

हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांना १६ वर्ष जुन्या एका हत्या प्रकरणात मोठं यश मिळाले आहे. पैशाच्या कारणास्तव एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. यातील आरोपीला पोलिसांनी गुजरातच्या सूरत येथे पकडले आहे. आरोपी मागील ४ वर्षापासून नाव बदलून तिथे राहत होता. त्याआधी तो पत्नी आणि मुलांसह नाव बदलून सातत्याने त्याचा ठिकाणा बदलत होता.
माहितीनुसार, हे प्रकरण ५ जानेवारी २००९ चं आहे. दिल्लीच्या बिंदापूर परिसरात एका लोखंडी सुटकेसमध्ये शीर नसलेला मृतदेह सापडला होता. या मृतकाची ओळख हरिश चंद्र उर्फ बबलू अशी पटली. तपासात हरिशचं त्याचा नातेवाईक बनारसी लाल याच्यासोबत पैशांवरून वाद सुरू होता असं पुढे आले. बनारसी लालने त्याचा साथीदार आशिक अली याच्यासोबत मिळून हरिशची हत्या केली होती. त्यानंतर या दोघांनी मिळून मृतदेहाचे धड आणि शीर वेगवेगळे करून तिथून फरार झाले होते.
क्राइम ब्रांचने गुजरातमधून केली अटक
आरोपी आशिक अली उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे राहायला होता. पोलिसांनी आशिकला अटक करण्यासाठी खूप काळापासून ट्रॅप लावला होता. त्यानंतर एका टीमने गुजरातमध्ये त्याला ट्रेस केले. त्यानंतर सूरतला पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला दिल्लीला आणले आणि त्याची चौकशी सुरू केली.
अखेर गुन्हा कबूल केला
दरम्यान, बनारसी लाल आणि हरीश चंद्र यांच्यात पैशांवरून रक्तरंजित संघर्ष झाल्याचे आशिक अलीने मान्य केले. हरिशच्या हत्येनंतर आशिक पत्नी आणि मुलांसह सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत राहिला. पकडण्यापूर्वी तो ४ वर्ष सूरतमध्ये राहत होता. आशिक अलीला २०११ साली फरार घोषित केले होते. या हत्या प्रकरणात बनारसीला याआधीच अटक केली होती. त्याच्यावर खटला चालला आणि आजीवन कारावासाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.