Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:02 IST2025-12-26T13:00:40+5:302025-12-26T13:02:55+5:30
नोएडातील एका अल्पवयीन मुलाने गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जे केलं, त्यामुळे सध्या पूर्ण शहरात खळबळ माजली आहे.

Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्...
प्रेमात माणूस काय करेल याचा नेम नाही, पण नोएडातील एका अल्पवयीन मुलाने गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जे केलं, त्यामुळे सध्या पूर्ण शहरात खळबळ माजली आहे. भाड्याने 'थार' गाडी घेऊन आपल्या प्रेयसीला भेटायला निघालेल्या एका १७ वर्षीय मुलाने, वाटेत अचानक स्वतःचे कुटुंबीय समोर दिसताच गाडी सुसाट पळवली. या गडबडीत त्याने ताबा गमावला आणि एकापाठोपाठ एक अशा पाच गाड्यांना जोरदार धडक दिली. सेक्टर-२४ मधील ईएसआयसी रुग्णालयाजवळ हा थरार घडला.
नेमका प्रकार काय?
दिल्लीतील कोंडली भागात राहणारा हा अल्पवयीन मुलगा आपल्या एका मित्रासह फिरण्यासाठी निघाला होता. त्याने कुठूनतरी भाड्याने महिंद्रा थार गाडी घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तो आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी नोएडाला येत होता. तो सेक्टर-२४ परिसरात पोहोचला असतानाच, त्याला त्याचे कुटुंबीय रस्त्यावर दिसले. आपण पकडले जाऊ या भीतीने तो प्रचंड घाबरला आणि तिथून पळून जाण्यासाठी त्याने गाडीचा वेग वाढवला.
अनेक वाहनांचा चक्काचूर
वेगाच्या नादात या मुलाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने सर्वात आधी एका बुलेट मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बुलेटस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर या थारने उभ्या असलेल्या आणि चालत्या अशा इतर चार ते पाच वाहनांना चिरडले. या अपघातात बुलेटसह इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांची मोठी कारवाई
अपघाताची माहिती मिळताच सेक्टर-२४ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त थार जप्त केली आहे. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. बुलेटस्वाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एजन्सीवरही पडणार हातोडा?
या घटनेनंतर आता गाड्या भाड्याने देणाऱ्या एजन्सीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. "एका अल्पवयीन मुलाला कागदपत्रांची शहानिशा न करता गाडी भाड्याने कशी दिली गेली?" असा सवाल एसीपी स्वतंत्र कुमार सिंह यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी एजन्सीवरही कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.