शिक्रापूर येथे डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 19:59 IST2020-10-01T19:59:15+5:302020-10-01T19:59:54+5:30
याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना केली अटक.

शिक्रापूर येथे डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर ) येथे कोविड केअर सेंटरमध्ये एका महिलेवर उपचार करण्यात आले.परंतू, डॉक्टरांनी पूर्ण बिल मागितल्यामुळे या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी पाच जणांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना या प्रकरणी तत्काळ अटक केली आहे, अशी माहिती तपास अधिकारी अनिल जगताप यांनी दिली.
याप्रकरणी डॉ. अजिंक्य तापकीर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रमेश थोरात, स्वप्नील वाघोल व रोहित गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलका चंद्रकांत थोरात (वय ५६, रा. शिक्रापूर) व त्यांची मुलगी नीता अनिल गायकवाड (वय ३५) या दोघी मायलेकी माऊलीनाथ हॉस्पिटलमध्ये १४ दिवस उपचार घेऊन बऱ्या झाल्या. दोघींचेही बिल थकविले म्हणून हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. अजिंक्य तापकीर यांनी त्यांना बिल मागितले. तसेच पूर्ण बिल भरले नाही म्हणून त्यांना डिस्चार्ज कार्ड व काही बिले दिली नाही. मेडिक्लेमसाठी आवश्यक बिले ती पूर्ण पैसे दिल्यानंतर देवू असे ते म्हणाले. दरम्यान, त्या दोघींचे नातेवाईक असलेले नीलेश थोरात व रमेश थोरात यांनी यांनी डॉक्टरांना वारंवार दमदाटी केली. मंगळवारी (ता. २९) रमेश थोरात, गोविंद गायकवाड व इतर दोघांनी डॉ. तापकीर यांना धक्काबुक्की जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत .