अत्याचार पत्नीवर झाला, आत्महत्या पतीने केली; संभाषण व्हायरल झाल्याने दु:खीकष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 14:28 IST2022-11-22T14:26:47+5:302022-11-22T14:28:46+5:30
महिलेवर अत्याचार करून तिच्या पतीस रेकॉर्डिंग पाठविणाऱ्या पाच जणांविरुद्ध रविवारी रात्रीच्या सुमारास पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्याचार पत्नीवर झाला, आत्महत्या पतीने केली; संभाषण व्हायरल झाल्याने दु:खीकष्टी
भोकरदन : पत्नीवर झालेला अत्याचार आणि आरोपींनी पाठविलेले संभाषणाचे रेकॉर्डिंग ऐकून बदनामीच्या भीतीने पीडितेच्या पतीने विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना ५ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव रेणुकाई (ता. भोकरदन, जि. जालना) येथे घडली. महिलेवर अत्याचार करून तिच्या पतीस रेकॉर्डिंग पाठविणाऱ्या पाच जणांविरुद्ध रविवारी रात्रीच्या सुमारास पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन देशमुख, रवी सपकाळ, गजानन शिरसाठ (सर्व रा. पिंपळगाव रेणुकाई) व इतर दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. तक्रारीत म्हटले की, रवी सपकाळ याच्याशी फोनवर बोलण्यास भाग पाडले. तसेच गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करून त्याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले. शिवाय तिच्यावर अत्याचार करण्यात आला. संशयित आरोपींनी महिलेशी झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पीडितेच्या पतीला पाठविल्या. त्या ऐकल्यानंतर बदनामी झाल्याचा समज करून पीडितेच्या पतीने ५ नोव्हेंबर रोजी विष पिऊन आत्महत्या केली. पोलिसांनी संशयित पाच जणांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.