महिलेचे अपहरण, हत्या करणारा चोरीच्या कारमधून पळाला; जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 19:44 IST2020-03-05T19:39:46+5:302020-03-05T19:44:23+5:30
त्याला न्यायालयात हजर केले असता ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महिलेचे अपहरण, हत्या करणारा चोरीच्या कारमधून पळाला; जेरबंद
नवी मुंबई : कारमध्ये बसलेल्या महिलेचे कारसह अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन मॅगझिन व नऊ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तो सराईत गुन्हेगार असून त्याने लुटीच्या उद्देशानेच महिलेचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. मात्र, याबाबत पोलिसांना अद्यापही संशय असल्याने अधिक तपास सुरू आहे. आरोपीचे नाव अशोककुमार कोनार (४२) असून तो तामिळनाडूचा आहे. त्याच्याविरोधात ५ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धक्कादायक! चोरटयांनी महिलेसह कार पळवली अन् तिच्यावर झाडली गोळी
उलवे सेक्टर 19 येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली होती. तेथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत शेलगरचे रहिवासी बाळकृष्ण भगत हे पैसे काढण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांच्या पत्नी प्रभावती भगत (56) ह्या कारमध्येच बसल्या होत्या. याच वेळी कार सुरू असल्याने व कारमध्ये प्रभावती ह्या एकटय़ाच बसल्या असल्याची संधी साधून एक जण कारमध्ये घुसला. त्याने कारसह प्रभावती यांचे अपहरण करून त्यांना सेक्टर 23 परिसरात नेले. त्या ठिकाणी प्रभावती यांच्यावर गोळी झाडून त्याने पळ काढला होता. या वेळी प्रभावती यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एनआरआय पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली होती. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी परिमंडळ १, परिमंडळ २ तसेच गुन्हे शाखेची विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासासाठी मिळवले होते. त्याद्वारे संशयित आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार बुधवारी संध्याकाळी खारघर परिसरात सापळा रचून एकाला ताब्यात घेण्यात आले. झडती वेळी त्याच्याकडे एक पिस्तूल, दोन मॅगङिान व नऊ काडतुसे आढळून आली. चौकशीत त्याचे नाव अशोककुमार मुर्गन कोनार (42) असल्याचे समोर आले. तसेच त्याने प्रभावती यांची हत्या केल्याचीही कबुली दिली. तसेच तोही उलवे सेक्टर 9 येथील राहणारा आहे. सखोल चौकशीअंती बुधवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. त्याने लुटीच्या उद्देशानेच प्रभावती यांचे अपहरण करून पळ काढल्याची कबुली दिल्याचे उपायुक्त पंकज डहाणो यांनी सांगितले. तर या प्रकरणी अधिकही चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. गुन्ह्यानंतर तो ज्या कारने उलवे परिसरातून पळाला होता, त्याच कारसह तो खारघरमध्ये आढळून आला. ही कार त्याने वाशी परिसरातून चोरली होती. त्यानंतर कारची नंबरप्लेट बदलून तो अनेक दिवसांपासून वापरत होता.