खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:36 IST2025-12-15T12:35:14+5:302025-12-15T12:36:48+5:30
एका वहिनीने तिच्या नणंदेला वाढदिवसाचे 'सरप्राईज गिफ्ट' दाखवण्याच्या बहाण्याने आधी खोलीत नेलं आणि नंतर तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ट्रान्स यमुना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधानगर परिसरात एका वहिनीने तिच्या नणंदेला वाढदिवसाचे 'सरप्राईज गिफ्ट' दाखवण्याच्या बहाण्याने आधी खोलीत नेलं आणि नंतर तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. यानंतर तिने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. तवा आणि टोकदार शस्त्राने तिच्या डोक्यावर ५० हून अधिक वार करण्यात आले. या घटनेत नणंद गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधानगर येथील रहिवासी गिरीश अग्रवाल हे रिक्षाचालक आहेत. त्यांचं कुटुंब एकाच घरात राहतं. गिरीश यांचा मुलगा शिवांशु याचे सुमारे एक वर्षापूर्वी कचहरी घाट येथील पूजासोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पूजा याच घरात राहू लागली. या कुटुंबात गिरीश यांची पत्नी संगीता अग्रवाल, मुलगी प्रिया अग्रवाल आणि धाकटा मुलगा आलोक हे देखील एकत्र राहतात.
घटनेच्या वेळी गिरीश अग्रवाल नेहमीप्रमाणे सकाळी कामावर निघून गेले होते. शिवांशु आणि त्याची आई संगीता एका नातेवाईकांकडे गेले होते, तर धाकटा मुलगा आलोक कोचिंगला गेला होता. घरात फक्त प्रिया अग्रवाल आणि तिची वहिनी पूजा होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे नऊ वाजता पूजाने प्रियाला सांगितलं की, १ जानेवारीला तिचा वाढदिवस आहे आणि तिने तिच्यासाठी एक 'सरप्राईज गिफ्ट' मागवलं आहे. पूजाने प्रियाला तिच्या खोलीत येण्यास सांगितलं.
खोलीत पोहोचल्यानंतर पूजाने आधी प्रियाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि नंतर तिचे हातही बांधले. यानंतर तिला बेडवर बसवले. याच दरम्यान अचानक पूजाने एका टोकदार वस्तूने प्रियाच्या डोक्यावर हल्ला केला. पहिला वार केल्यानंतर प्रियावर सतत हल्ला करण्यात आला. हल्ल्यासाठी चाकू, तवा आणि चिमटा यांसारख्या घरगुती वस्तूंचा वापर करण्यात आला. प्रियाच्या म्हणण्यानुसार, तिच्या डोक्यावर ५० हून अधिक वेळा वार करण्यात आले. ती सतत ओरडत राहिली आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत राहिली, परंतु डोळ्यांवर पट्टी आणि हात बांधलेले असल्याने ती स्वतःला वाचवू शकली नाही.
प्रियाने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण जास्त रक्तस्राव झाल्यामुळे ती खाली कोसळली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमले. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला आणि आतील दृश्य पाहून लगेच तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. तसेच, पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. संगीता अग्रवाल यांनी सांगितलं की, त्या घरी पोहोचल्या तेव्हा जमिनीवर रक्त पसरलेलं होतं. अनेक घरगुती वस्तूंवर रक्ताचे डाग होते. जखमी अवस्थेत प्रियाने त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. प्रियाला गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांना तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर अनेक गंभीर जखमा आढळल्या आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिची प्रकृती अजूनही गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.