Ahmedabad Cyber Crime: सायबर गुन्हेगारही हायटेक होत असल्याचे एका धक्कादायक घटनेतून समोर आले आहे. गुगलच्या जेमिनी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एका व्यावसायिकाचा डीपफेक व्हिडिओ बनवून आधार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनला चुना लावल्याची घटना अहमदाबादमध्ये घडली आहे. याप्रकरणी सायबर क्राईम ब्रँचने चार आरोपींना अटक केली असून, या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रासह सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
अहमदाबादमधील एका व्यावसायिकाला दोन दिवसांपासून बँकेचे ओटीपी येणे बंद झाले होते. संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना जे आढळले ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले. आरोपींनी व्यावसायिकाच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर कोणत्याही ओटीपीशिवाय बदलला होता आणि त्याच्या बायोमेट्रिक डेटामध्ये फेरफार केली होती.
असा रचला 'AI'चा सापळा
तपासात समोर आलेली गुन्ह्याची पद्धत अत्यंत प्रगत आणि भीतीदायक आहे. आरोपींनी गुगलच्या जेमिनी एआयचा वापर करून संबंधित व्यावसायिकाचा हुबेहूब दिसणारा डीपफेक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या मदतीने आरोपींनी आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करुन घेतले. त्यानंतर आधार पोर्टलवर जाऊन लिंक असलेला जुना मोबाईल नंबर बदलून आरोपींनी स्वतःचा नंबर रजिस्टर केला. आरोपींनी पीडित व्यक्तीच्या डिजिलॉकर खात्यात शिरकाव करून तिथून महत्त्वाची कागदपत्रे मिळवली. या कागदपत्रांच्या आधारे जिओ पेमेंट्स बँकेत बनावट खाते उघडले आणि त्यावरून २५ हजार रुपयांचे कर्जही उचलले.
सरकारी किटचा गैरवापर
या टोळीतील एक आरोपी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये काम करत होता. त्याने आधार यंत्रणेत असलेल्या आपल्या अधिकारांचा आणि सरकारी किटचा गैरवापर करून मोबाईल नंबर बदलण्याचे काम केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कनुभाई परमार, आशिष वाणंद, मोहम्मद कैफ पटेल आणि दीप गुप्ता अशी आहेत.
बँकिंग क्षेत्रासाठी धोक्याची घंटा
काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग क्षेत्रातील एआयच्या वाढत्या धोक्याबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत अँथ्रोपिकच्या क्लॉड मिथोससारख्या प्रगत एआय मॉडेल्समुळे सायबर सुरक्षेला असलेल्या धोक्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर लगेचच अहमदाबादमध्ये घडलेल्या या घटनेने आता बायोमेट्रिक सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
Web Summary : Ahmedabad cybercrime: Criminals used AI to create a deepfake video of a businessman for Aadhar biometric verification, bypassing OTP to change his mobile number. They then stole lakhs by fraudulently accessing his bank accounts and taking loans. Four suspects were arrested.
Web Summary : अहमदाबाद में साइबर अपराधियों ने एआई का उपयोग करके एक व्यापारी का डीपफेक वीडियो बनाया और आधार बायोमेट्रिक सत्यापन किया। ओटीपी को दरकिनार करते हुए, उन्होंने उसका मोबाइल नंबर बदलकर लाखों की चोरी की। चार संदिग्ध गिरफ्तार।