मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि क्रूर गुन्ह्याची घटना समोर आली आहे. पाणी मागितल्यावरून झालेल्या वादातून एका अभियंत्याने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. एवढंच नाही, तर त्याने आईच्या मदतीने मृतदेह प्रयागराजला नेऊन जाळून टाकला.
ही घटना विंध्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एनटीपीसी कॉलनीमध्ये १५ ऑगस्ट रोजी घडली. निखिल दुबे नावाचा अभियंता येथे एनटीपीसी कंपनीत काम करतो. १५ ऑगस्ट रोजी निखिलने पत्नी आभाकडे पाणी मागितले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. रागाच्या भरात निखिलने आभाचं डोकं स्वयंपाकघरातील स्प्रॅबवर आपटलं, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
आईच्या मदतीने पुरावे मिटवण्याचा प्रयत्नपत्नीचा मृत्यू झाल्याचे पाहून निखिल घाबरला. त्यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी आई दुर्गेश्वरी देवीची मदत घेतली. दोघांनी मिळून आभाचा मृतदेह एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून कारमधून प्रयागराजला नेला आणि तिथे तो जाळला.
विंध्यनगरच्या टीआय अर्चना द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी आभाच्या वडिलांनी म्हणजेच सुनील दुबे यांनी फोन करून पोलिसांना सांगितले की, निखिलने त्यांना मुलीच्या मृत्यूची माहिती दिली आहे. मात्र, प्रयागराजला जाऊन पाहिले असता घर बंद होते, त्यामुळे त्यांना निखिलवर संशय आला.
सीसीटीव्हीमुळे उघडकीस आले सत्यसुनील दुबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निखिलच्या विंध्यनगरमधील घरातील कुलूप तोडून तपास केला, पण त्यांना काहीच सापडलं नाही. कंपनीच्या एचआरकडून पोलिसांना कळले की निखिलने व्हॉट्सअॅप कॉलवर पत्नीचा अंत्यसंस्कार प्रयागराज येथील शंकरघाटवरील विद्युत शवदाहगृहात केल्याचे सांगितले होते.
पोलिसांनी तातडीने प्रयागराज गाठून सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना आढळले की निखिलने पत्नीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये लपेटून कारच्या मागील सीटवर ठेवला होता. पोलिसांच्या नजरेंतून वाचण्यासाठी त्याने गाडीच्या काचेला पडदेही लावले होते. सीसीटीव्ही फुटेजमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी निखिल दुबे आणि त्याची आई दुर्गेश्वरी देवी यांना प्रयागराजच्या शास्त्री नगरमधून अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.