पोलीस असल्याचा धाक दाखवत महिलेच्या साडे चार लाखांच्या बांगड्या पळवल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 23:07 IST2023-01-22T22:41:55+5:302023-01-22T23:07:28+5:30
याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी रविवारी दिली

पोलीस असल्याचा धाक दाखवत महिलेच्या साडे चार लाखांच्या बांगड्या पळवल्या
ठाणे : रिक्षातून कामावर जाणाऱ्या एका महिला प्रवाशाला पोलिस असल्याची बतावणी करत दोन भामट्यांनी चार लाख ५० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने हिसकावल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी रविवारी दिली.
माजीवडा येथे राहणारी ६० वर्षीय महिला २१ जानेवारीला सकाळी १०.१५ वाजता रिक्षाने कामावर जात होती. ती ऋतू बिझनेस पार्क समोरील रस्त्याने जात असताना दुचाकीवरून तिच्या पाठीमागून आलेल्या दोघांनी तिची रिक्षा थांबवून पोलिस असल्याची बतावणी केली. त्यानंतर बोलण्यात गुंतवून तिच्याकडील सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याची गोफ हातचलाखीने काढून घेतली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस. के. महाडीक तपास करीत आहेत.