Baramati Crime news:बारामतीची २५ वर्षांची राधिका. ती तीन मुलांची आई. सोशल मीडियावर तिची ओळख झाली जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील राजेंद्रशी. राजेंद्र २३ वर्षांचा. त्याचंही लग्न झालेलं. त्यालाही एक मुलगी. पण, इन्स्टाग्रामवर अचानक दोघांची भेट झाली. बोलणं वाढलं. आणि दोघेही भेटले. राजेंद्र राधिकाला घरीही घेऊन गेला. पण, घरी जे घडलं. त्यानंतर ते बाहेर पडले आणि महिनाभराने त्यांचे मृतदेह सापडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोशल मीडियावर प्रेम संबंध जुळलेल्या बारामती येथील विवाहित महिलेने पाचोरा येथील विवाहित तरुणासोबत स्वतःच्या बालकासह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ५ मे रोजी रात्री घडली.
मयतांची नावे काय?
राजेंद्र निंबा मोरे (वय २३, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा), राधिका ऊर्फ सोनी लहू ठाकरे (२५, रा. बारामती, जि. पुणे) व तिचा चार वर्षांचा मुलगा सारंग ठाकरे अशी मयतांची नावे आहेत.
तिघांची ओळख कशी पटली?
पाचोरा-परधाडे रेल्वेमार्गावर रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पुरुष व महिला तसेच लहान मुलाचा मृतदेह आढळला. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. हे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. मृतांची ओळख बराच वेळ पटत नव्हती. ६ मे रोजी सकाळी हातावर गोंधलेल्या नावावरून राजेंद्रची ओळख पटली.
याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत. मृतदेहाचे विच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून, मयत राधिका हिच्या सासरी व माहेरी नातेवाइकांना ही घटना कळविण्यात आली आहे.
बारामतीच्या राधिकाचे आणि राजेंद्रचे असे जुळले प्रेम
मयत राजेंद्र निंबा मोरे हा भातखंडे खुर्द, ता. पाचोरा येथील रहिवासी होता. त्याचा चार वर्षांपूर्वीच विवाह झाला. त्यास पत्नी व एक मुलगी असून, राजेंद्र याने इंस्टाग्रामवर राधिका ऊर्फ सोनी लहू ठाकरे हिच्याशी गेल्या महिन्यातच प्रेमसंबंध जुळवले.
राधिका ऊर्फ सोनी हिस पती व तीन मुले आहेत. त्यापैकी लहान मुलगा सारंग लहू ठाकरे यास तिने सोबत आणले होते. राजेंद्र व राधिका यांची भेट मागील महिन्यात सप्तशृंगी गडावरील यात्रेच्या निमित्ताने झाल्यावर त्याने राधिका हिला भातखंडे खुर्द गावी आणले. राजेंद्रच्या आई-वडिलांना ही बाब मान्य नसल्याने त्यास घरात प्रवेश दिला नाही.
प्रेमीयुगुल गेल्या महिनाभरापासून भटकत होते. अखेर त्यांनी ५ मे रोजी रात्री आठच्या सुमारास सोबत असलेली कपड्यांची पिशवी एका झाडाखाली ठेवून धावत्या रेल्वेखाली बालकासह आत्महत्या केली.