आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका विवाहित भारतीय नौदल जवानाने आपल्या लग्नाआधीच्या प्रेयसीची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिच्या शरीराचे पाच तुकडे केले त्यापैकी तीन तुकडे एका रेफ्रिजरेटर आणि सुटकेसमध्ये लपवले आणि उरलेले दोन जाळून टाकले. पोलिसांनी आरोपी नौदल जवानाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नौदल कर्मचाऱ्याने ऑनलाइन चाकू मागवून आपल्या लग्नाआधीच्या प्रेयसीच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर त्याने ते अवयव एका रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. गेल्या रविवारी त्याने अडविवरमजवळील एका मोकळ्या जागेत तिचे शीर आणि हात जाळले. आरोपीची ओळख रवींद्र (३०) असून तो आयएनएस देगा येथे तैनात आहे. मृत व्यक्तीची ओळख मोनिका (३१) अशी पटली असून ती विशाखापट्टणमच्या तातिचेतला पालेम भागातील रहिवासी होती. रवींद्र २०२१ पासून तिच्या संपर्कात होता. त्या दोघांची ओळख एका डेटिंग APP द्वारे झाली होती. कालांतराने त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आणि ते विशाखापट्टणममध्ये गार्डन आणि थिएटरमध्ये वारंवार भेटत असत असं पोलिसांनी सांगितले.
रवींद्रला धमकी द्यायची मोनिका
त्यानंतर २०२४ मध्ये रवींद्रने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. मोनिकाने त्यांच्या संबंधांबद्दल त्याच्या पत्नीला सांगण्याची धमकी दिली होती. इतकेच नाही तर मोनिकाने त्याच्याकडून ३.५ लाख रुपयेही घेतले होते. यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली, ज्यानंतर त्याने कट रचून मोनिकाची हत्या केली असं आरोपीने पोलिसांसमोर दावा केला आहे.
ऑनलाइन चाकू मागवून केले मृतदेहाचे तुकडे
या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रवींद्रला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. घटनेच्या दिवशी रवींद्रने मोनिकाला विशाखापट्टणमच्या गाजुवाका भागातील त्याच्या फ्लॅटमध्ये बोलावले होते, जिथे त्यांच्यात जोरदार वाद झाला. या रागात रवींद्रने मोनिकाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने ऑनलाइन चाकू मागवून मृतदेहाचे पाच तुकडे केले. त्याने शीर आणि दोन्ही हात निर्जनस्थळी नेत जाळून टाकले. त्याने धड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर कंबर आणि दोन्ही पाय एका सुटकेसमध्ये लपवले.
अशीच एक घटना २०२२ मध्ये घडली
ही घटना १८ मे २०२२ रोजी झालेल्या श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येची आठवण करून देणारी आहे. श्रद्धा वालकरचा तिच्या लिव्ह-इन पार्टनर आफताबने दिल्लीतील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळा दाबून खून केला होता. त्यानेही तिच्या शरीराचे तुकडे केले. ते कापलेले अवयव रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले आणि पकडले जाऊ नये म्हणून अनेक दिवस राजधानीतील विविध ठिकाणी फेकून दिले.