"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 08:21 IST2025-07-26T08:20:48+5:302025-07-26T08:21:11+5:30
मेहबूब कुरेशी हा नई जिंदगी परिसरातील विजयलक्ष्मी नगरात राहण्यास होता. तो एका दुकानात कामाला होता.

"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
सोलापूर - "मेरे को बहुत तकलीफ दिया, बहुत ब्याज लिया, मुझे मिलने के बाद मारा, गाली दिया" अशी चिठ्ठी लिहून तरुणाने राहत्या घरी जीवनयात्रा संपवली आहे. घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत मेहबूब अब्दुल हक कुरेशी याने आत्महत्या केली परंतु चिठ्ठीतील मजकूराने वेगळीच शंका उपस्थित झाली आहे.
घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली. मात्र पोलीस तपासात मेहबूबला लिहिता-वाचता येत नसल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या आत्महत्येची चिठ्ठी लिहिली कोणी याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगितले.
मेहबूब कुरेशी हा नई जिंदगी परिसरातील विजयलक्ष्मी नगरात राहण्यास होता. तो एका दुकानात कामाला होता. मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा त्याच्याजवळ एक चिठ्ठी आढळली होती. त्यात जब्बार शेख असं नाव आढळले होते. याच्याकडून मेहबूब याने पैसे घेतले होते.
दरम्यान, जब्बार शेखकडून होत असणाऱ्या त्रासाला कंटाळून मेहबूबने आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची तक्रार नोंदवण्यासाठी कुरेशी कुटुंबाने पोलिसांची भेट घेतली. यात त्यांचे म्हणणं पोलिसांनी ऐकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.