मिस्ड कॉलने सुरू झालेली प्रेम कहाणी... दोनदा लग्न, दोनदा घटस्फोट, 'हलाला' आणि आता थेट लैंगिक शोषणाची तक्रार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:19 IST2025-12-11T11:18:44+5:302025-12-11T11:19:03+5:30
एसी मेकॅनिक पतीचे किळसवाणे कृत्य; १० वर्षांच्या नात्याचा शेवट पोलीस ठाण्यात; आरोपीला अटक

मिस्ड कॉलने सुरू झालेली प्रेम कहाणी... दोनदा लग्न, दोनदा घटस्फोट, 'हलाला' आणि आता थेट लैंगिक शोषणाची तक्रार!
एका मिस्ड कॉलपासून सुरू झालेली एक प्रेमकहाणी दहा वर्षांच्या प्रवासानंतर आता पोलिस स्टेशनच्या दारात पोहोचली आहे. उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे एका घटस्फोटित महिलेने तिचा माजी पती अझहर नवाज याच्यावर बलात्कार आणि वारंवार छळाचा आरोप केला आहे. पोलिसांनी तक्रारीवरून तत्काळ कारवाई करत एसी मेकॅनिक असलेल्या अझहरला अटक केली आहे.
अजब प्रेमकहाणीचा प्रवास
२०१५ मध्ये अमरोहा येथील सैद नागली भागातील एका महिलेचा आणि दिल्लीतील एसी मेकॅनिक अझहर नवाज याचा संपर्क एका मिस्ड कॉलमुळे झाला. यातून प्रेमसंबंध जुळले आणि कुटुंबीयांच्या संमतीने दोघांचे लग्न झाले. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांमध्ये मतभेद झाले आणि अझहरने तिच्या पत्नीला तिहेरी तलाक दिला. मात्र, पुन्हा दोघांना एकत्र राहावे वाटले. यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने बुलंदशहर येथील एका मौलानांमार्फत हलाला करण्यात आले.
हलाला झाल्यानंतर दोघांनी पुन्हा लग्न केले. लग्नानंतर त्यांना एक मुलगीही झाली. मात्र, मुलीच्या जन्मानंतर त्यांच्यातील वाद पुन्हा वाढले आणि अझहरने तिला दुसऱ्यांदा तिहेरी तलाक दिला.
बलात्कार आणि तिसऱ्यांदा 'हलाला'चा आग्रह
दुसरा घटस्फोट झाल्यावर अझहरने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. पण, त्याला दुसऱ्या पत्नीपासून मूल होऊ शकले नाही. यानंतर, त्याने पुन्हा पीडित पहिल्या पत्नीकडे धाव घेतली. पीडितेचा आरोप आहे की, दुसऱ्या पत्नीपासून मुले होत नसल्याचे कारण देत अझहरने तिला तिसऱ्यांदा हलाला करण्यास प्रवृत्त केले. याच काळात त्याने तिच्यावर बलात्कार देखील केला. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर पीडितेने अझहरविरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली.
सैद नांगली पोलिस स्टेशनचे प्रभारी विकास सेहरावत यांनी या घटनेची माहिती दिली. पीडितेच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून, आरोपी अझहर नवाजला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नाव असलेल्या आणखी चार आरोपींपैकी तिघांचा शोध सुरू असून, पोलीस पुढील चौकशी करत आहेत.