हिंदू मुलाला मुस्लिम मुलीशी प्रेम करणं ठरलं जीवघेणं, शस्त्राने वार करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 21:45 IST2022-05-27T21:45:01+5:302022-05-27T21:45:43+5:30
Murder Case : मुलीचा भाऊ, शहाबुद्दीन (१९) आणि नवाज (१९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हिंदू मुलाला मुस्लिम मुलीशी प्रेम करणं ठरलं जीवघेणं, शस्त्राने वार करून हत्या
२५ वर्षीय हिंदू तरुण आणि मुस्लिम तरुणी यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले. नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे त्याची हत्या करण्यात आली. हत्येप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करावा लागल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. ही घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात घडली. विजय कांबळे (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. मुलीचा भाऊ, शहाबुद्दीन (१९) आणि नवाज (१९) अशी अटक केलेल्या 3 आरोपींची नावे आहेत.
विजयला रेल्वे पुलाजवळ हल्लेखोरांनी घेरले होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादी झाली. हाणामारी झाली असता हल्लेखोरांनी विजयला गंभीर जखमी केले. काही वेळातच विजयचा मृत्यू झाला. विजय मुस्लिम तरुणीवर प्रेम करत होता. त्याला तिच्यासोबत लग्न देखील करायचे होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध होता, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी विजयच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीत मुलीचे वडील आणि भावाने मुलावर चाकूने वार केल्याचा आरोप केला आहे.
आम्ही बसून बोलत होतो. काही वेळाने दोन लोक आमच्या समोर उभे राहिले. ते कोण आहेत हे आम्हाला कळलेच नाही. अचानक त्यांनी विजयवर हल्ला केला. त्याच्याकडे शस्त्रही होते. शस्त्राने त्यांनी विजयला अनेक वार केले आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला, असे विजयच्या मित्राने सांगितले.