गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 11:04 IST2025-04-23T11:04:05+5:302025-04-23T11:04:39+5:30

पोलिसांनी ती चिठ्ठी आणि मोबाईल जप्त केला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी गर्दी करत हॉस्टेलच्या गेटसमोर ठिय्या मांडला

A girl living in a hostel in Solapur committed suicide by hanging herself. | गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं

गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं

सोलापूर : आठ दिवसांपूर्वी ड्रेस चोरीचा आळ घेतल्याने मानसिक तणावात जाऊन स्नेहा सौदागर गायकवाड हिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. तिने मंगळवारी सायंकाळी दयानंद कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतली. दरम्यान, जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका तिच्या नातेवाइकांनी घेतली.

स्नेहाच्या हॉस्टेलच्या रूममध्ये तीन जण पार्टनर होते. त्यातील एक पार्टनर ही गावी गेली होती. दुसरी ही हॉस्टेलमध्ये खाली गेली होती. तेव्हा ती गळफास घेतल्याचे आढळले. ती जेव्हा पंख्याला लटकत होती. त्यावेळी तिच्या पायाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. यामुळे पोलिसांनी ती चिठ्ठी आणि मोबाईल जप्त केला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी गर्दी करत हॉस्टेलच्या गेटसमोर ठिय्या मांडला. नंतर नातेवाइकांनी रस्त्याच्या मधोमध बसून कारवाई होईपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

दोन महिन्यात दुसरी घटना, कारवाई करा
दोन महिन्यात या कॉलेजमध्ये दोघांना प्राण गमवावे लागते. यासाठी येथील अधिकारीच जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी करत तिच्या नातेवाइकांनी आंदोलन केले. दरम्यान, येत्या चार मे रोजी तिचा वाढदिवस होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

चार ओळींची चिठ्ठी
स्नेहा गायकवाड हिने वहीच्या पानावर चार ओळीची चिठ्ठी लिहिली आहे. त्यात तिने मी स्नेहा गायकवाड, मला जगण्याचा कंटाळा आला आहे. यामुळे मी आत्महत्या करत आहे. यामध्ये कोणाचाही हात नाही, म्हणत त्या चिठ्ठीच्या डाव्या बाजूस सही आहे. दरम्यान, ही चिठ्ठी तिने लिहिलीच नसावी, असा संशय तिच्या नातेवाइकांनी व्यक्त केला.

गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं ओ...
सौदागर गायकवाड यांना एकूण तीन मुली आणि एक मुलगा. त्यातील स्नेहा ही द्वितीय कन्या होती. त्यांच्या घरची हलाखीची परिस्थिती असून मुलीला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी मिळेल ते काम करत होते. स्नेहाच्या शिक्षणासाठी तिच्या वडिलांनी गावचा कचरा साफ करून तिला शिक्षण घ्यायला लावले. पण या अधिकाऱ्यांमुळे तिला जीव गमवावा लागला, असे म्हणत नातेवाइकांनी हंबरडा फोडला.

सायन्सला मिळाले ६२ टक्के
स्नेहा ही मंगळवारीच हॉस्टेलवर आली होती. सकाळी अकरावीचा विज्ञान शाखेचा निकाल घोषित करण्यात आला. यात तिला ६२ टक्के गुण मिळाले, या आनंदातून तिने आपल्या भावाला, पित्याला फोन करून ही माहिती दिली अन् सायंकाळी तिचा मृतदेह पहायला मिळाला असे वाटले नव्हते म्हणत तिच्या आईवडील छाती बडवून घेत होते.

Web Title: A girl living in a hostel in Solapur committed suicide by hanging herself.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.