झाडीतून आला रडण्याचा आवाज, जवळ जाताच काळजाचा ठोका चुकला! आईच्या मृतदेहाशेजारी बसलेली चिमुकली..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:16 IST2026-03-24T12:15:58+5:302026-03-24T12:16:27+5:30
रंगारेड्डीगुडा गावातील काही शेतकरी आपल्या शेताकडे जात होते. तेव्हा निर्जन ठिकाणी असलेल्या झाडीतून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला अन्..

झाडीतून आला रडण्याचा आवाज, जवळ जाताच काळजाचा ठोका चुकला! आईच्या मृतदेहाशेजारी बसलेली चिमुकली..
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातून माणुसकीला लाजवणारी एक घटना समोर आली आहे. एका ३१ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली, पण या घटनेची सर्वात भयानक आणि वेदनादायी बाजू म्हणजे तिची अडीच वर्षांची मुलगी. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या आईच्या मृतदेहाजवळ ही चिमुरडी रात्रभर बसून होती. भूक, तहान आणि प्रचंड भीती असतानाही ती आपल्या आईला उठवण्यासाठी टाहो फोडत होती, पण आई कायमची झोपी गेली होती.
झाडीतून आला आवाज अन्...
रविवारी (२२ मार्च) सकाळी रंगारेड्डीगुडा गावातील काही शेतकरी आपल्या शेताकडे जात होते. तेव्हा निर्जन ठिकाणी असलेल्या झाडीतून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. शांतता भंग करणारा तो आवाज ऐकून शेतकरी थांबले. आवाजाच्या दिशेने गेल्यावर समोर जे दिसले, ते पाहून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे शोभा नावाच्या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि तिची अडीच वर्षांची लेक आईच्या छातीला बिलगून रडत होती.
रात्रभर मृत्यूच्या सावलीत चिमुरडी!
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, शनिवारी रात्री उशिरा शोभाची हत्या करण्यात आली असावी. याचा अर्थ ती चिमुरडी त्या घनदाट अंधारात, रक्ताचा वास आणि आईचा थंड पडलेला देह घेऊन अख्खी रात्र तिथेच होती. पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोठा दगड जप्त केला आहे, ज्याने शोभाचे डोके ठेचण्यात आले होते.
प्रेमसंबंध आणि सायकलचा 'तो' सापळा?
शोभाचा विवाह १० वर्षांपूर्वी राजू नावाच्या व्यक्तीशी झाला होता, त्यांना ७ वर्षांचा मुलगा आहे. मात्र, नंतर शोभाचे गावातीलच नरसिम्हुलु नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले आणि ती पतीपासून वेगळी झाली. नरसिम्हुलुसोबत राहताना तिला ही अडीच वर्षांची मुलगी झाली. शनिवारी नरसिम्हुलुने शोभाला फोन करून मुलासाठी नवीन सायकल घेऊन देतो, असे सांगून बोलावले होते. सायंकाळी शोभा आपल्या अडीच वर्षांच्या लेकीला घेऊन बाहेर पडली, पण ती पुन्हा जिवंत परतलीच नाही.
मुख्य संशयित फरार, शोध सुरू
शोभाची आई करुणम्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणात नरसिम्हुलु हा मुख्य संशयित असून तो सध्या फरार आहे. सायकल देण्याचे आमिष दाखवून त्यानेच शोभाला निर्जनस्थळी नेऊन संपवले असावे, असा पोलिसांना दाट संशय आहे. त्या निरागस चिमुरडीला सुरक्षित वाचवण्यात आले असले तरी, तिच्या डोळ्यांसमोर आईवर झालेला तो वार आणि ती काळरात्र तिच्या मनावर कायमची जखम देऊन गेली आहे.