स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:31 IST2025-11-08T14:30:29+5:302025-11-08T14:31:25+5:30
भाविकाचे वडील मनीष गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवाबगंज पोलिसांनी ब्रिजेश निषादविरुद्ध तक्रार दाखल केली आहे

स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूर येथे स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळे एका युवतीचा जीव गेला आहे. गुरुवारी कानपूरच्या गंगबैराज परिसरात बाइकवरून स्टंट करणाऱ्या युवकाने ११० किमी स्पीडने एका युवतीच्या स्कूटीला उडवले. ही टक्कर इतकी भीषण होती की त्यात युवती ५० मीटर फरफटत गेली. या युवतीचं नाव भाविका गुप्ता असे आहे. या भयंकर अपघातात भाविकाच्या जबड्यातील दात तुटून बाहेर पडले. डोक्याच्या हाडांना जबर मार बसला. शरीरावरही अनेक ठिकाणी गंभीर इजा झाली. अपघातानंतर भाविकाला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारावेळी तिचा मृत्यू झाला.
उन्नावच्या शुक्लागंज सर्वोदय नगर येथील रहिवासी मनीषा गुप्ता हॉटेल लँडमार्कमध्ये शेफ आहेत. मनीषा यांची एकुलती एक मुलगी भाविका ही बीएच्या अंतिम वर्षात होती. तिचा भाऊ अंकित गुप्ता याने सांगितले की, गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास भाविका तिची मैत्रिण नेहा मिश्रासोबत स्कूटीवरून फिरायला गेली होती. बॅरेज मॅगी पॉइंटवरून भाविकाने तिची स्कूटर वळवताच बिठूरपासून ११० किमी वेगाने स्टंट करणाऱ्या एका दुचाकीस्वाराने तिला जोरदार धडक दिली. भाविकाची स्कूटर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. दुचाकी चालवणारा तरुण आणि त्याचा साथीदार इतर मित्रांसह दुचाकीवरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या नवाबगंज पोलिसांनी जखमी भाविकाला रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा भाविकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भाविकाच्या कवटीलाही फ्रॅक्चर
भाविकाचे वडील मनीष गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवाबगंज पोलिसांनी ब्रिजेश निषादविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. नवाबगंज पोलिस ठाण्याचे प्रभारी केशव तिवारी म्हणाले की, आरोपीचा शोध सुरू आहे. अपघातात दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्तीही जखमी झाली आहे. दोघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार भाविकाचा मृत्यू तिच्या कवटीला फ्रॅक्चर झाल्यामुळे कोमात गेल्याने झाला.
दरम्यान, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट भयानक आहे. भाविकाच्या फासळ्या तुटल्या होत्या आणि तिच्या हृदयात, फुफ्फुसात घुसल्या होत्या. तिचा खांदा, दोन्ही हात आणि पाय, कंबर आणि इतर १२ हून अधिक हाडे तुटली होती. तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा आढळल्या. घटनास्थळी सापडलेल्या तरुणाच्या बाईकच्या हँडलबारखाली पडला होता, त्यात एक इंस्टाग्राम आयडी सापडला. आयडी शोधला असता तो बिथूर येथील रहिवासी ब्रिजेश निषादचा असल्याचे निष्पन्न झाले. ब्रिजेश स्टंट करत असे आणि ते इंस्टाग्रामवर अपलोड करत असायचा. पोलिसांनी सध्या यावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.