बिअरची बॉटल डोक्यात फोडून केले जखमी, बारमध्ये केला राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 21:27 IST2022-03-08T21:26:05+5:302022-03-08T21:27:02+5:30
Assaulting Case in Bar : या राड्या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चौघाडी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बिअरची बॉटल डोक्यात फोडून केले जखमी, बारमध्ये केला राडा
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३ मधील आंचल बारमध्ये सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून एका चौघाडीने लवेश गायकर व मित्र लाबेश यांच्या डोक्यावर बिअरची बॉटल व काच फोडून जखमी केले. या राड्या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चौघाडी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरातील आंचल बारमध्ये लवेश गायकर हे मित्र संदीप पडवळ व लाबेश यांच्यासोबत सोमवारी रात्री साडे आठ वाजता ड्रिंक घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी समोरच्या टेबलवर बसलेल्या चौघाडी पैकी एक जण खाली ओकत होता. खाली ओकण्या ऐवजी बेसिन मध्ये ओक असा सल्ला संदीप पडवळ यांनी दिल्याचा राग त्यांना आला. त्यांनी संदीपला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी लवेश गायकर व लाबेश यांनी मध्यस्थी केली असता चौघाडीने लावेश व लाबेश यांना मारहाण करून बिअर बॉटल व काचेने हल्ला केला. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून चौघाडी पळून गेली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.