नाव विराटचं विचारलं अन् गोळी सुनीलवर झाडली; गैरसमजातून व्यवसायिकाची हत्या, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 08:04 IST2024-12-08T08:03:30+5:302024-12-08T08:04:06+5:30
दिल्लीच्या शाहदरा इथं मॉनिंग वॉकसाठी निघालेल्या व्यापाऱ्यावर ७-८ राऊंड फायरिंग झाली होती. यात व्यापाऱ्याला ४-५ गोळ्या लागल्या

नाव विराटचं विचारलं अन् गोळी सुनीलवर झाडली; गैरसमजातून व्यवसायिकाची हत्या, काय घडलं?
नवी दिल्ली - शहरातील फर्श बाजार इथं व्यापारी सुनील जैन यांच्या हत्येत समोर आलेल्या एका ट्विस्टनं पोलीस हैराण झाले आहेत. दिवाळीच्या दिवशी झालेल्या डबल मर्डरचा बदला घेण्यासाठी आलेल्या आरोपींनी गैरसमजातून सुनील जैन यांची हत्या केली होती. सध्या पोलीस Mistaken Identity(चुकीची ओळख) या हत्येच्या अँगलने तपास करत आहेत.
सुनील जैनसोबत स्कूटीवर बसलेल्या सुमित नावाच्या व्यक्तीने पोलीस तपासात जे सांगितले त्याने अधिकाऱ्यांना धक्का बसला. सुमितने सांगितले की, निळ्या रंगाच्या अपाचे बाईकने २ हल्लेखोर आले होते, त्यातील एक जण स्कूटीजवळ आला आणि हरियाणी भाषेत विचारलं विराट कोणाचं नाव आहे, त्यावर सुमितने इथं कुणी विराट नाही. त्यानंतर हल्लेखोराने सुनील जैनला गोळी मारली. त्यानंतर दुसऱ्यानेही गोळीबार केला. स्कूटीवर असलेल्यांपैकी कुणाचं नाव विराट नव्हते मग हे हल्लेखोर कोणत्या विराटला शोधत होते, त्या विराट नावाच्या व्यक्तीचा धागा पकडून पोलीस शोध घेत आहेत.
दिवाळीच्या दिवशी फर्श बाजार परिसरात काका पुतण्याची हत्या झाली होती. या हत्याकांडात एक अल्पवयीन आरोपीला पकडण्यात आले होते. या अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचे नावही विराट आहे. त्यामुळे या आरोपीच्या वडिलाचा खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोरांनी गैरसमजातून सुनील जैन यांची हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. सध्या सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. तपासात अन्य अँगलही पुढे आले आहेत त्याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, दिल्लीच्या शाहदरा इथं मॉनिंग वॉकसाठी निघालेल्या व्यापाऱ्यावर ७-८ राऊंड फायरिंग झाली होती. यात व्यापाऱ्याला ४-५ गोळ्या लागल्या. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला होता त्यात व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले. तिथे ५२ वर्षीय सुनील जैन यांना गोळी मारण्यात आल्याचे पुढे आले. सकाळी मॉर्निंग वॉक करून ते घराकडे परतत असताना हा हल्ला झाला.