आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:07 IST2025-12-23T09:04:35+5:302025-12-23T09:07:20+5:30
Ex IPS Amar Singh Chahal: माजी आयपीएस अधिकारी अमर सिंग चहल यांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, प्रकृती गंभीर आहे. त्यांनी असा निर्णय घेण्यापूर्वी एक १२ पानांची चिठ्ठी लिहिली आहे.

आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
Amar Singh Chahal IPS: पटियालामध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. सोमवारी ही घटना समोर आली. माजी आयपीएस अधिकारी अमर सिंग चहल यांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत. पोलिसांना घटनास्थळी एक बारा पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. ज्यात त्यांनी आठ कोटी दहा लाख रुपयांचा उल्लेख केलेला आहे.
पटियालाचे वरिष्ठी पोलीस अधीक्षक वरुण शर्मा यांनी याबद्दल सांगितले की, 'अमर सिंग चहल यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, अमर सिंग चहल यांना रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हा त्यांची अवस्था वाईट होती. खूप रक्तस्राव झालेला होता. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.'
गोळी काढण्यासाठी तीन तास शस्त्रक्रिया
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर सिंग चहल यांच्यावर तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनी छातीत गोळी झाडली, जी त्यांच्या फुफ्फुसामध्ये फसली होती. शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढण्यात आली. त्यांना पुढील १२ ते २४ तास निगराणी खाली ठेवले जाणार आहे. त्याची प्रकृती कधीपर्यंत चांगली होईल याबद्दल आताच काही सांगता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.
पोलीस महासंचालकांच्या नावाने पत्र
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे. ही पोलीस महासंचालक गौरव यादव यांच्या नावाने लिहिली आहे. अमर सिंग यांनी चिठ्ठीमध्ये आरोप केला आहे की, एफ-७७७ डीबीएस वेल्थ इक्विटी रिसर्च ग्रुपच्या नावाने WhatsApp आणि Telegram ग्रुप चालवत होते.
त्यांनी डीबीएस बँक आणि त्याच्या सीईओंसोबत संबंधित असल्याचा दावा केला. आरोपींनी शेअर ट्रेडिंग, आयपीओ अलॉटमेंट आणि ओटीसी ट्रेड आणि क्वांटिटेटिव्ह फंडमधून मोठा नफा मिळून देतो, असा दावा केला.
अमर सिंग चहल यांचा विश्वास जिंकण्यासाठी नकली डॅशबोर्ड बनवला गेला आणि त्यांना प्रचंड नफा दाखवला गेला. हळूहळू त्यांनी भरपूर पैसा गुंतवणूक करण्यासाठी घेतला. जो नफा मिळाला होता, त्यातून पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर पैसे काढताना सेवा शुल्क, कर आणि अतिरिक्त शुल्क या नावाखाली कोट्यवधी रुपये घेतले.
मी खचलोय आहे आणि...
अमर सिंग चहल यांनी चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की, पैसे घेऊनही गुंतवणुकीचे पैसे परत केले गेले नाही. हे खूप मोठे रॅकेट आहे. पैसे कुठून कुठे जातात, हे शोधण्यासाठी एसआयटी नेमावी. त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणांकडे याचा तपास देण्यात यावा अशी मागणी त्यांनी पोलीस महासंचालक गौरव यादव यांच्याकडे केलेली आहे.
पत्रात त्यांनी या घटनेमुळे मी खूप खचून गेलो आहे. आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालो आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मी माझ्या सुरक्षा रक्षकाची रायफल वापरली कारण माझ्याकडे स्वतःचे शस्त्र नव्हते. मी माझ्या कुटुंबीयांची आणि जवळच्या सगळ्यांची माफी मागतो, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.