गोळीबार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ८ गुन्हेगार जेरबंद; कोंढव्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 07:57 PM2021-01-30T19:57:36+5:302021-01-30T19:58:09+5:30

कोयते घेऊन गल्लीतून गेल्याच्या रागातून केला गोळीबार

8 criminals arrested for tried to murder of a youth by firing; Incidents in Kondhwa | गोळीबार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ८ गुन्हेगार जेरबंद; कोंढव्यातील घटना

गोळीबार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ८ गुन्हेगार जेरबंद; कोंढव्यातील घटना

Next

पुणे : नाना पेठेतून रात्रीच्या वेळी कोयते घेऊन मोटार सायकलवरुन तरुण गेल्याने आमच्या हद्दीत येऊन रुबाब दाखविल्याच्या रागातून आंदेकर टोळीने कोंढव्यात तरुणावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी कृष्णराज आंदेकर याच्यासह ८ जणांना अटक केली आहे.

मुनाफ रियाज पठाण (वय २३, रा. नाना पेठ), कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ३१, रा. नाना पेठ), विराज जगदिश यादव (वय २५, रा. हांडेवाडी रोड, आनंदनगर), आवेझ आशफाक सय्यद (वय २०, रा, गणेश पेठ), अनिकेत ज्ञानेश्वर काळे (वय २५, रा. डोके तालीम, नाना पेठ), अक्षय नागनाथ कांबळे (वय २३, रा. ससाणेनगर), शाहवेज अब्दुल रशिद शेख (वय ३४, रा. गुरुवार पेठ), ओमकार शिवप्रसाद सांळुखे (वय २१, रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या घटनेत विघ्नेश अशोक गोरे (वय २०, रा. कात्रज) याच्या मांडीला गोळी लागली होती. गोरे व त्याचे मित्र अतुल दरेकर, ईश्वर म्हस्के, बिहारी भैय्या हे मोटारसायकलवरुन जात असताना स्पोर्ट बाईकवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. गोळी गोरे याच्या मांडीला लागून तो जखमी झाला होता. ही घटना २३ जानेवारी रोजी मध्यरात्री कात्रज कोंढवा रस्त्यावर झाला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना फिर्यादी गोरे हा माहिती देण्यास आढेवेढे घेत होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर अधिक माहिती समोर आली. गोरे व त्याचे मित्र २३ जानेवारीला रात्री १० वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतून मोटारसायकलवरुन कोयते घेऊन आरडाओरडा करत गेले होते. त्यांनी तेथील एका स्टॉलवरील कृष्णराज आंदेकर याच्या आईचे पोस्टरही कोयत्याने फाडले होते. ही गोष्ट त्याच्या साथीदारांनी आंदेकर याला सांगितली. त्यावेळी तो हडपसर येथे होता. आपल्या एरियात येऊन रुबाब करताना याचा राग येऊन सर्व आरोपी त्यांचा शोध घेऊन लागले. तेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास ते कात्रज कोंढवा रोडवरुन जाताना त्यांना दिसले. तेव्हा त्यांनी गोळीबार केला होता. पण तेथून जवळच खडी मशीन चौकीत गोरे व त्याचा मित्र गेल्याने हल्लेखोर पळून गेले होते. ही माहिती समोर आल्यावर कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या सहकार्यांनी ८ जणांना अटक केली. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना ३ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, बेकायदेशीरपणे हत्यारे बाळगून गोंधळ घालून दहशत पसरविल्याप्रकरणी फिर्यादी व त्याच्या साथीदारांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

..
आपल्या हद्दीत येऊन आरडाओरडा करतात. पोस्टर फाडतात, या कारणावरुन हा गोळीबार करण्यात आला होता. अटक केलेल्या आरोपींवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी, आर्म ॲक्ट असे गुन्हे दाखल आहेत. - नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त.

Web Title: 8 criminals arrested for tried to murder of a youth by firing; Incidents in Kondhwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.