सायबर गुन्हेगारांची लढवली अनोखी शक्कल, म्हैस देण्याच्या नावाखाली ६५ हजारांची फसवणूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:03 IST2024-12-13T18:02:24+5:302024-12-13T18:03:02+5:30
याप्रकरणी चंद्रदेव यादव यांनी गुरुवारी हंसदिहा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सायबर गुन्हेगारांची लढवली अनोखी शक्कल, म्हैस देण्याच्या नावाखाली ६५ हजारांची फसवणूक!
दुमका : एकीकडे सरकार सायबर गुन्हे टाळण्यासाठी लोकांना जागरूक करत आहे, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. यादरम्यान, झारखंडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. म्हैस देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी छोटी रानबहियार पंचायतीच्या आलुबाडा गावातील चंद्रदेव यादव यांची ६५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चंद्रदेव यादव यांनी गुरुवारी हंसदिहा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चंद्रदेव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर ६२६८६५३३५२ या नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने आपले नाव अशोक कुमार शर्मा असल्याचे सांगत त्याने स्वत: गाई-म्हशींचा व्यापारी असल्याचे सांगितले. तसेच, राजस्थानमध्ये स्वत:ची डेअरी असून संपूर्ण भारतात दुभत्या गायी आणि म्हशींचा पुरवठा करतो, असे सांगितले. यानंतर त्याने व्हिडिओ कॉलद्वारे चंद्रदेव यादव यांना दुभत्या गायी-म्हशी दाखवल्या. यामधील एक म्हैस चंद्रदेव यादव यांना आवडली.
चंद्रदेव यादव यांना आवडलेल्या म्हशीची किंमत ६० हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. यानंतर अशोक कुमार शर्माने त्याचे पॅनकार्ड, आधारकार्ड आणि डेअरी फार्मचे फोटो चंद्रदेव यादव यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवले आणि पाच हजार रुपये ॲडव्हान्स पाठवण्यास सांगितले. चंद्रदेव यादव यांनीही १० डिसेंबर रोजी फोन पेद्वारे पाच हजार रुपये पाठवले. यानंतर ११ डिसेंबर रोजी फोनपेद्वारे १३०००, २१५००, १७००० आणि ९ हजार रुपये पाठवण्यात आले. कधी म्हशीची किंमत तर कधी विम्याच्या नावावर आणि वाहतुकीच्या नावावर सर्व पैशांची मागणी करण्यात आली.
६० हजार रुपये दिल्यानंतर अशोकने जीएसटीच्या नावावर आणखी पैसे मागितले असता, आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे चंद्रदेव यादव यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी गुरुवारी हंसदिहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपल्यासोबत झालेल्या सायबर फसवणुकीची माहिती दिली. चंद्रदेव यादव यांनी अर्जासोबत पोलिसांना त्याच्याशी कॉल झालेले सर्व मोबाईल नंबर, फोन पे व्यवहार, तसेच कथित गुरे व्यापारी अशोक कुमार शर्मा यांनी पाठवलेले त्याचे पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत देखील दिली आहे.