कॅफेत डोकावले अन् पडद्याआडचे चित्र पाहून सारेच चक्रावले; नाशिकमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 19:51 IST2025-03-02T19:50:22+5:302025-03-02T19:51:06+5:30
एका बेसमेंटमधील कॅफेमध्ये टेबलच्या भोवती अंधार करून आणि पडदे लावून खास सोय आढळल्याने सारेच आश्चर्यचकित झाले.

कॅफेत डोकावले अन् पडद्याआडचे चित्र पाहून सारेच चक्रावले; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik Crime : एमडी प्रकरणामुळे गाजलेल्या नाशिकमधील काही रेस्टॉरंटमध्ये युवक युवतींसाठी पडदे टाकून खास सोय केली जाते अशा आशयाची तक्रार आल्यानंतर शनिवारी आमदार देवयानी फरांदे यांनी दुपारी सरकारवाडा पोलिसांसह धडक दिली. गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कलजवळ असलेल्या एका बेसमेंटमधील कॅफेमध्ये टेबलच्या भोवती अंधार करून आणि पडदे लावून खास सोय आढळल्याने सारेच आश्चर्यचकित झाले. अर्थात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कोणतीही कारवाई केली नव्हती.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कॅफे प्रकरण वाढत चालले आहे. हुक्का पार्लरवर तर अनेकदा छापे पडले आहेत, याशिवाय यापूर्वी एमडी ड्रग्जच्या वेळी नाशिक पोलिसांनी गंगापूर रोड कॉलेज रोडसह अनेक भागांत कॅफेंची तपासणी केली तेव्हा युवक-युवतींना अश्लील चाळे करताना पकडण्यात आले आणि त्यावेळी संबंधितांना तंबीही देण्यात आली आहे. मात्र, तरीही कॅफेचे फॅड कमी झालेले नाही. शनिवारी दुपारी अशाच प्रकारे विद्या विकास सर्कलजवळील एका कॅफेमध्ये अशाच प्रकारे युवक-युवतींसाठी खास सोय केल्याची तक्रार आमदार फरांदे यांच्याकडे आली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांना घेऊन त्याठिकाणी फरांदे पोहोचल्या. यावेळी बेसमेंटमध्ये कॅफे सुरू होता; परंतु वेगवेगळ्या दिशेने दरवाजे होते आणि आत अंधुक प्रकाशाचे दिवे आणि पडदे लावल्याचे आढळले.
पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही
आमदार फरांदे यांनी कॅफेवर धाड टाकून ताशी भाडे आकारण्याचा प्रकार उघड केला. मात्र, गंगापूर पोलिस ठाण्याने संबंधित हॉटेल चालक किंवा अन्य युवक-युवतींवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट कोणत्या कलमान्वये दाखल करता येईल याचा अभ्यास करावा लागेल, असे उत्तर दिल्याने आमदार फरांदे संतप्त झाल्या आहेत. पोलिसांनी टाळाटाळ केल्यास यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर कारवाईची मागणी करावी लागेल, असे त्या म्हणाल्या.
मनपाकडूनही मोजमाप
नाशिक महापालिकेचे कर्मचारीदेखील गेले होते. पोलिसांच्या वतीने मनपाला पत्र देऊन तळमजल्यावरील बांधकाम करण्याची सूचना करण्यात आली आहे.