तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत तरुणींना बेदम मारहाण करणाऱ्या 'त्या' टवाळखोरांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 15:21 IST2021-08-05T15:14:20+5:302021-08-05T15:21:47+5:30
Crime News : दोन तरुणींचा विनयभंग देखील करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. अखेर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत तरुणींना बेदम मारहाण करणाऱ्या 'त्या' टवाळखोरांना अटक
कल्याण - कल्याण नजीक असलेल्या मलंगगडच्या पायथ्याशी फिरायला गेलेल्या तरुण तरुणींना काही टवाळखोरांकडून मारहाण करण्यात आली होती. इतकंच नाही तर दोन तरुणींचा विनयभंग देखील करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. अखेर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. यावेळी या टवाळखोरांच्या कचाट्यातून तरुण तरुणींनी आपली सुटका करून घेतली होती.
नेवाळी पोलीस चौकी गाठून घडलेला प्रकार सांगितला. मात्र मेडिकल करून या तसेच येथे तक्रार होणार नाही असं येथील पोलिसांनी त्यांना सांगत कानावर हात ठेवले. यातील पीडित तरुणीने हिंमत दाखवत सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली. त्यानंतर याप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या तपासासाठी दोन पथक रवाना करण्यात आली होती. अखेर या प्रकरणी पाच आरोपीना अटक करण्यात आली असून यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत.
संतापजनक! तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत बेदम मारहाण, दोघींचा विनयभंग
सर्व आरोपी घटनास्थळापासून जवळ असलेल्या कुशवली गावातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही जोर धरू लागली होती. मात्र संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या या टवाळखोरांना हा अधिकार कोणी दिला आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.