वेफर्स काउंटर अंगावर पडून ४ वर्षीय मुलीचा मृत्यू, दुकान मालक, कामगाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 14:24 IST2023-05-19T14:23:38+5:302023-05-19T14:24:16+5:30
संजन चौहान असे मृत मुलीचे नाव असून, ती तिचा मोठा भाऊ आणि चुलत बहिणीसोबत ए-१ वेफर्सच्या दुकानात वेफर्स खरेदी करण्यासाठी गेली होती.

वेफर्स काउंटर अंगावर पडून ४ वर्षीय मुलीचा मृत्यू, दुकान मालक, कामगाराला अटक
मुंबई : भावंडांसोबत वेफर खरेदी करायला गेलेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीच्या अंगावर वेफर्सचे काउंटर पडले. त्यामुळे गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दुकान मालक आणि कामगारावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.
अंधेरी पूर्वेकडील पंप हाउस परिसरात मंगळवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. संजन चौहान असे मृत मुलीचे नाव असून, ती तिचा मोठा भाऊ आणि चुलत बहिणीसोबत ए-१ वेफर्सच्या दुकानात वेफर्स खरेदी करण्यासाठी गेली होती. तपासादरम्यान, ती ज्या काउंटरखाली अडकली त्या काउंटरला चाके असल्याचे पोलिसांना आढळून आले.
मुलगी काउंटरजवळ खेळत असताना अचानक ते उलटले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. काउंटर थोडा उंच होता त्यामुळे तो आपल्या दिशेने उलटताना पाहून तिचा मोठा भाऊ आणि चुलत बहीण ताबडतोब लांब पळाले. मात्र, खेळण्यात व्यस्त असलेली मयत वेळेवर दूर जाऊ शकली नाही. अपघात झाल्यानंतर दुकानाचा मालक बाहेर आला आणि त्याने त्याच्या कामगारासह काही स्थानिकांची मदत घेत अडकलेल्या मुलीला वाचविण्यासाठी काउंटर दूर हलवला. त्यानंतर मुलीला रुग्णालयात नेले; मात्र दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
न्यायालयीन कोठडी -
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०४(अ) अंतर्गत दुकान मालक आनंद राज आणि त्यांचा कामगार कृष्णा यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करत न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.