शेअरमार्केटच्या नावे ३१ लाखांची फसवणूक, २० लाख रुपये ‘फ्रिज’, छत्तीसगढमधून चार आरोपींना अटक

By प्रदीप भाकरे | Published: April 11, 2024 05:05 PM2024-04-11T17:05:04+5:302024-04-11T17:05:31+5:30

१३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

31 lakh fraud in the name of share market, 20 lakh rupees freezed four accused arrested from Chhattisgarh | शेअरमार्केटच्या नावे ३१ लाखांची फसवणूक, २० लाख रुपये ‘फ्रिज’, छत्तीसगढमधून चार आरोपींना अटक

शेअरमार्केटच्या नावे ३१ लाखांची फसवणूक, २० लाख रुपये ‘फ्रिज’, छत्तीसगढमधून चार आरोपींना अटक

प्रदीप भाकरे, अमरावती: परतवाडा येथील आशिष बोबडे यांची शेअर मार्केेटमध्ये गुंतवणुकीच्या नावावर तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. त्यातील २० लाख रुपये ‘फ्रिज’ करवून ठेवण्यात, गोठविण्यात ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याला यश आले आहे. दरम्यान याप्रकरणी, छत्तीसगढमधून चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

परतवाडा येथील आशिष महादेवराव बोबडे (४४, घामोडिया प्लॉट) यांनी फोर्थ इंडियन स्टॉक मार्केट ॲनालिसिस ॲंड लर्निंग नावाचे शेअर मार्केट हा व्हॉटसॲप ग्रुप जॉईन केला. ग्रुपवर आलेल्या लिंकवर क्लिक करुन बोबडे यांनी त्यावर युझर आयडी व पासवर्ड बनविला. लिंकदवारे एकुण ३१ लाख ३५ हजार रुपयांचे शेअर खरेदी केले. त्यानंतर पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता ते संकेतस्थळ बंद दिसून आले. संबंधित मोबाईल क्रमांक देखील बंद असल्याने त्यांनी आपली फसवणुक झाल्याची फिर्याद परतवाडा पोलिसांत नोंदविली. त्यानंतर तपासाला वेग देण्यात आला. दरम्यान, अटक आरोपींमध्ये संजय शामलाल टंडन (२५, रा. जि.एस.टी. ऑफीस जवळ, जाजगीर), अनिलकुमार जमनालाल कटकवार (२५ वर्ष रा. सिंगरा जि. सक्ती), मनोजकुमार श्रीजयराम चंद्रा (३६,रा. खुळबेना, जि. सारंगड) व सुनिलदत्त कार्तिकराम सतरंज (३१, रा. बंदरबेली ता. मालखरोदा जि. सक्ती सर्व राज्य छत्तीसगड) यांचा समावेश आहे.

पोलिसांची दिशाभूल

सायबर ठाणेप्रमुख धीरेंद्रसिंग बिलवाल, एएसआय सुनील बनसोड, हवालदार पंकज गोलाईतकर, अंमलदार सागर धापर व सायबर टीमने या फसवणूक प्रकाराचा कसोशीने तपास चालविला. त्यादरम्यान आरोपी वेगवेगळे मोबाईल वापरत असून ते कॉलव्दारे आप-आपसात संपर्कात आहेत. त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविल्याची माहिती समोर आली. त्या बँक खात्यांची साखळी जोडून व आरोपींनी विविध बँक खात्यामध्ये पैसे पाठविल्याचा तपशीलाच्या आधारे छत्तीसगढ येथून चार आरोपींना ५ एप्रिल रोजी अटक केली.

आभासी चलनात व्यवहार

गुन्हयातील अटक व फरार आरोपींनी आभासी चलन (Virtual Currency) मध्ये देवाण - घेवाण केल्याचे तपासात पुढे आले आहे. अद्याप काही आरोपींना अटक होणे बाकी आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीदरम्यान अनेक बाबींचा उलगडा होईल तथा आणि उर्वरित आरोपींना पकडले जाईल, अशी माहिती सायबरचे पोलीस निरिक्षक धीरेंद्रसिंग बिलवाल यांनी सांगितले.

Web Title: 31 lakh fraud in the name of share market, 20 lakh rupees freezed four accused arrested from Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक