मुंबईत NCB च्या कारवाईचं प्रकरण ताजं असतानाच उरी सेक्टरमध्ये ३० कोटींचं ड्रग्ज जप्त, तस्कर पळाले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 14:57 IST2021-10-03T14:57:00+5:302021-10-03T14:57:38+5:30
मुंबईत अमलीपदार्थ नियंत्रण कक्षानं (एनसीबी) क्रूझवरील ड्रग्ज पार्टी उधळून लावल्याचं प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे भारतीय सीमेवरुन देखील मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबईत NCB च्या कारवाईचं प्रकरण ताजं असतानाच उरी सेक्टरमध्ये ३० कोटींचं ड्रग्ज जप्त, तस्कर पळाले!
मुंबईत अमलीपदार्थ नियंत्रण कक्षानं (एनसीबी) क्रूझवरील ड्रग्ज पार्टी उधळून लावल्याचं प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे भारतीय सीमेवरुन देखील मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं उरी सेक्टरमध्ये २५ ते ३० किलोग्रॅम हिरोईन आणि इतर ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत जवळपास ३० कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे.
भारतीय सैन्याच्या संयुक्त सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहिम राबवत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. शनिवारी रात्री उशिरा एलओसीजवळ उत्तर काश्मीर भागात उरी शहरातून ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. बारामुल्लाच्या एसएसपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाला एलओसीजवळ काही संशयित घडामोडींची माहिती मिळाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत ३० किलो वजनाचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज पेडलर भारतीय सेनेच्या हालचालींवर दूरवरून लक्ष ठेवून होते. भारतीय सैन्याच्या जवानांना पाहताच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. भारतीय सैन्याच्या जवानांनी ड्रग्ज साठा जप्त करुन पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी केली जात आहे.
मुंबईतही एनसीबीची मोठी कारवाई
मुंबईत एका क्रूझवर एनसीबीनं विशेष मोहिम राबवत मोठी ड्रग्ज पार्टी उधळून लावली आहे. यात आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये बड्या उद्योगपतींच्या मुला-मुलींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. ड्रग्ज प्रकरणाबाबत त्याचीही कसून चौकशी केली जात आहे. आर्यन खान देखील या क्रूझ पार्टीत उपस्थित होता.