२६४ कोटींचे बनावट रिफंड, माजी आयकर अधिकारी ईडीच्या जाळ्यात; अभिनेत्री कीर्ती वर्माही सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 08:04 AM2023-07-15T08:04:54+5:302023-07-15T08:05:06+5:30

मुंबईत कारवाई, तिघांना दहा दिवसांची कोठडी

264 crore fake refund, former Income Tax officer in ED's net | २६४ कोटींचे बनावट रिफंड, माजी आयकर अधिकारी ईडीच्या जाळ्यात; अभिनेत्री कीर्ती वर्माही सहभागी

२६४ कोटींचे बनावट रिफंड, माजी आयकर अधिकारी ईडीच्या जाळ्यात; अभिनेत्री कीर्ती वर्माही सहभागी

googlenewsNext

मुंबई : तब्बल २६३ कोटी रुपयांच्या बोगस आयकर रिफंड क्लेम प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईत कार्यरत असलेला माजी आयकर निरीक्षक व त्याच्या दोन मित्रांना शुक्रवारी अटक केली. या तिघांविरोधात जानेवारी २०२२ मध्ये ‘सीबीआय’नेही गुन्हा दाखल केला होता. मात्र, या तिघांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारत मनी लाँड्रिंग केल्याचे उघडकीस आल्यानंतर आता ईडीने त्यांना अटक केली आहे. या तिघांनाही १० दिवसांची ईडी कोठडी सुनाविण्यात आली आहे. 

तानाजी अधिकारी असे या माजी अधिकाऱ्याचे नाव असून तो मुंबईत आयकर विभागात निरीक्षक पदावर कार्यरत होता, त्यावेळी रिफंड क्लेम जारी करण्याचे काम त्याच्याकडे होते. याकरिता त्याच्या वरिष्ठांच्या संगणकाचा लॉगिन आयडी व पासवर्डही त्याच्याकडे होता. त्याद्वारे तो रिफंड जारी करीत होता. त्याने विविध क्लेम जारी करीत ते पैसे त्याचा मित्र भूषण पाटील आणि राजेश शेट्टी यांच्या कंपनीत जमा केले. नोव्हेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० या एका वर्षाच्या काळात रिफंडच्या एकूण १२ प्रकरणांद्वारे त्याने तब्बल २६४ कोटी रुपये या कंपनीमध्ये वळविले.

सरकारी तिजोरीतून एकाच बँक खात्यात एवढी मोठी रक्कम आल्याचे संबंधित बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर बँकेने त्या खात्याची पडताळणी सुरू करीत त्याची माहिती आयकर विभागाला दिली. याप्रकरणी आयकर विभागाच्या आयुक्तांनी सर्वप्रथम ‘सीबीआय’मध्ये तक्रार दाखल केली मात्र मनी लाँड्रिंगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला. ईडीने जानेवारीपासून आतापर्यंत या तिघांचे कर्जत, खंडाळा, लोणावळा, पुणे, उडुपी येथील भूखंड आणि पनवेल, मुंबई येथील फ्लॅट्स, तसेच बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी अशा तीन आलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत. त्याची किंमत ३० कोटी रुपये आहे. याखेरीज बँक खात्यातील रक्कम अशी ११६ कोटी रुपयांची जप्ती झाली आहे. 

अभिनेत्री कीर्ती वर्माही सहभागी
एकेकाळी जीएसटी विभागात अधिकारी असलेली आणि आता अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कीर्ती वर्मा हिचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे. या प्रकरणात आयकर अधिकाऱ्याचा मित्र असलेल्या भूषण पाटील याची ती मैत्रीण आहे. या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशांद्वारे तिने गुरगाव येथे एक मालमत्ता १ कोटी २ लाख रुपयांना खरेदी केली होती. एकाच वर्षात तिने ती मालमत्ता १ कोटी १८ लाख रुपयांना विकली. याचे व्यवहारही ईडीच्या रडारवर आल्यानंतर तिच्या बँक खात्यातील ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

 

Web Title: 264 crore fake refund, former Income Tax officer in ED's net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.