२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:24 IST2025-10-30T12:23:15+5:302025-10-30T12:24:04+5:30
आईसाठी आपलं मूल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मात्र, आता एका आईनेच आपल्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

AI Generated Image
आईसाठी आपलं मूल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टींच्या आधी आई नेहमी आपल्या मुलांना प्राधान्य देते. मात्र, आता एका आईनेच आपल्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ लाखांचा विमा आणि अनैतिक संबंध या क्रूर घटनेला कारणीभूत ठरले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेत आईने आपल्या तरुण मुलाचा खूनच केला नाही तर, त्याचा मृतदेह हायवेवर नेऊन रस्त्यावर फेकला. पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी सुरू करताच हे धक्कादायक सत्य समोर आले.
कानपूर देहात येथील अंगदपूर बरौर गावात ही धक्कादायक घटना घडली. गावातील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय प्रदीप शर्माचा मृतदेह २७ ऑक्टोबर रोजी औरैया-कानपूर महामार्गाच्या बाजूला संशयास्पद परिस्थितीत आढळला. सुरुवातीला हा प्रकार रस्ते अपघाताचा वाटत होता, परंतु शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतर पोलिसांना तरुणाची हत्या झाल्याचा संशय आला.
प्रियकर मनीषवर अपहरण आणि हत्येचा आरोप
पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा धक्कादायक खुलासे झाले. प्रदीपचे आजोबा जगदीश नारायण यांनी ऋषी कटियार उर्फ रेशु आणि त्याचा भाऊ मयंक उर्फ मनीष यांच्यावर अपहरण आणि हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. मंगळवारी रात्री निगोही येथील दुर्वासा आश्रमाजवळ पोलिसांचा दोन्ही आरोपींशी सामना झाला, ज्यामध्ये ऋषीच्या पायाला गोळी लागली आणि दोन्ही भावांना अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान त्यांनी सांगितलेला घटनाक्रम ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले. त्यांनी चौकशीत उघड केले की, प्रदीपच्या आईचे मनीषशी अनैतिक संबंध होते. प्रदीपला त्यांच्या या नात्याबद्दल कळले होते. त्याचा या नात्याला विरोध होता. यामुळेच त्याच्या आईचा राग अनावर झाला. दरम्यान, प्रदीपच्या नावावर १८ लाख रुपयांच्या तीन विमा पॉलिसी होत्या. विम्याच्या पैशाच्या लोभाने आणि प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने प्रियकर मनीषसोबत मिळून स्वतःच्या मुलाला संपवण्याचा कट रचला.
तरुणाची गळा दाबून हत्या
२७ ऑक्टोबर रोजी, दोन्ही भाऊ प्रदीपला त्यांच्या कारमधून मुंगीसापूरला घेऊन गेले. वाटेत त्यांनी त्याचा गळा दाबून खून केला आणि अपघात झाल्याचे भासवण्यासाठी त्याचा मृतदेह औरैया-कानपूर महामार्गावर फेकून दिला. त्यानंतर ते पळून गेले. एएसपी राजेश पांडे यांनी सांगितले की, ऋषी कटियारवर झाशी आणि बरौरमध्ये आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. तो एक कुख्यात गुन्हेगार आहे. या प्रकरणाच्या तपासात प्रदीपच्या आईची भूमिका देखील उघड झाली आहे, त्यामुळे लवकरच तिला ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल.