न वटणारे धनादेश देऊन १८ लाख ४७ हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 18:24 IST2019-07-09T18:23:18+5:302019-07-09T18:24:27+5:30
लॉजिस्टिक कंपनीचे बनावट स्टॅम्प वापरून व बनावट बिले सादर केली..

न वटणारे धनादेश देऊन १८ लाख ४७ हजारांची फसवणूक
पिंपरी : लॉजिस्टिक कंपनीचे बनावट स्टॅम्प वापरून व बनावट बिले सादर केली. तसेच न वटणारे धनादेश देऊन १८ लाख ४७ हजारांची फसवणूक केली. चिंचवड येथे २५ डिसेंबर २०१७ ते २९ मे २०१८ या कालवधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सुमित गांधी, उज्ज्वला गांधी, राजेंद्र पटणी, महेश जैन, रुपल राजदीप, अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महेश रमाकांत पुण्यार्थी (वय ४६, रा. कल्याण, जि. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महेश पुण्यार्थी यांचा लॉजिस्टिकचा व्यवसाय आहे. आर्थिक फसवणूक करण्याच्या हेतूने आरोपींनी फिर्यादी महेश पुण्यार्थी यांचा विश्वास संपादन केला. लॉजिस्टिक कंपनीचे बनावट स्टॅम्प वापरून व बनावट बिले सादर करून गाडी भाड्यापोटी फिर्यादी पुण्यार्थी यांच्याकडून एनईएफटी स्वरुपात १८ लाख ४७ हजार रुपये घेतले. ती रक्कम परत देण्यापोटी न वटणारे धनादेश दिले. बनावट कागदपत्रे तयार करून पुण्यार्थी यांची १८ लाख ४७ हजारांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.