चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:36 IST2025-12-10T19:22:59+5:302025-12-10T19:36:02+5:30
पोलिसांनी चालत्या बसमधून एका टॉपर विद्यार्थ्याचे अपहरण करुन त्याला बनावट ड्रग्ज प्रकरणात अडकवले.

चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
MP Police Fake Drugs Case: मध्य प्रदेशातील पोलीस व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मल्हारगढ पोलीस स्टेशन, ज्याला नुकताच देशातील ९ वा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणा म्हणून गौरवण्यात आले होते, तेथील अधिकाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करत एका निष्पाप विद्यार्थ्याला अंमली पदार्थांच्या खोट्या प्रकरणात अडकवले होते. उच्च न्यायालयात पुरावे सादर झाल्यानंतर मंदसौरच्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः कोर्टात येऊन पोलिसांची चूक कबूल केली आहे.
चालत्या बसमधून विद्यार्थ्याचे बेकायदेशीर अपहरण
मल्हारगढ येथील रहिवासी आणि १२ वीचा हुशार विद्यार्थी सोहन (१८) हा २९ ऑगस्ट २०२५ रोजी बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. साध्या वेशातील पोलिसांनी मल्हारगढजवळ अचानक बस थांबवली आणि सोहनला जबरदस्तीने बसमधून खाली उतरवले. यानंतर काही तासांतच पोलिसांनी सोहनला २.७ किलो अफूसह अटक केल्याचा आणि अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट पकडल्याचा खोटा दावा केला. त्याला दुसऱ्याच दिवशी कोर्टात हजर करून जेलमध्ये पाठवण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेजने उघड केला कट
सोहनच्या कुटुंबाने या बेकायदेशीर अटकेविरोधात उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठात धाव घेतली. कोर्टात सादर केलेले सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ आणि साक्षीदारांचे जबाब हे पोलिसांच्या दाव्याच्या पूर्णपणे विरोधात होते. या पुराव्यात पोलिसांचा पाठलाग किंवा अंमली पदार्थांची जप्ती दिसली नाही. उलट साध्या वेशातील पोलीस सोहनला ओढून बसमधून बाहेर काढताना दिसले. सोहन आधीच पोलिसांच्या बेकायदेशीर ताब्यात असताना त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असे ज्येष्ठ वकील हिमांशु ठाकूर यांनी कोर्टात स्पष्ट केले.
Sohan, a Class 12 student, was travelling by bus to visit relatives when it was abruptly stopped near Malhargarh (MP). A few men, later identified as cops, boarded the bus and dragged him off in full public view.
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) December 10, 2025
There was no explanation, no warrant, and no prior FIR. He was… pic.twitter.com/aO9RV5NDG3
एसपींनी कोर्टात केले कबूल
मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने मंदसौरचे पोलीस अधीक्षक विनोद कुमार मीणा यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. एसपी मीणा यांनी कोर्टासमोर हे मान्य केले की, सोहनला खरंच मल्हारगढ पोलीस अधिकाऱ्यांनी बसमधून उचलले होते आणि हे संपूर्ण प्रकरण बनावट होते. एफआयआरमधील अटकेची वेळ आणि ठिकाण सीसीटीव्ही व्हिडिओशी जुळत नाही. तसेच, ज्या अधिकाऱ्यांनी सोहनला बसमधून उतरवले, ते मल्हारगढ पोलीस स्टेशनचेच कर्मचारी होते, ही बाबही त्यांनी मान्य केली.
६ पोलीस निलंबित; कोर्टाचा आदेश राखून
एसपी मीणा यांनी या गैरकृत्याबद्दल न्यायालयाची माफी मागितली. त्यांनी कोर्टाला माहिती दिली की, सोहनला बसमधून ओढून नेणाऱ्या पोलिसांसह मल्हारगढ पोलीस स्टेशनच्या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोन महिन्यांच्या बेकायदेशीर अटकेनंतर सोहनची सुटका झाली. न्यायालयाने या प्रकरणातील क्रूर कृत्याबद्दल गंभीर टिप्पणी केली असून, यावर आपला आदेश राखून ठेवला आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, या प्रकरणावर कठोर कारवाई अपेक्षित आहे, कारण पोलिसांनी एका निर्दोष विद्यार्थ्याचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता.