"आई, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जातेय"; कुटुंबीय वाट पाहत राहिले पण मुलगी घरी आलीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 17:07 IST2024-10-18T17:02:29+5:302024-10-18T17:07:19+5:30
मुलगी बारावीची विद्यार्थिनी होती आणि तिने तिच्या आईला फोन करून सांगितले होतं की, ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जात आहे. पण त्या दिवसानंतर ती घरी परतली नाही.

"आई, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जातेय"; कुटुंबीय वाट पाहत राहिले पण मुलगी घरी आलीच नाही
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी बारावीची विद्यार्थिनी होती आणि तिने तिच्या आईला फोन करून सांगितलं होतं की, ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जात आहे. पण त्या दिवसानंतर ती घरी परत आली नाही. तिच्या मृत्यूबद्दल समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. वरिष्ठ अधिकारी आणि सीआयडी पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नादियातील कृष्णनगर येथे एका मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी भाजलेल्या खुणा आहेत. मंगळवारी काही लोकांनी कृष्णनगर पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह पाहिला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
मुलीने तिच्या आईला फोन केला आणि सांगितलं की, ती तिचा बॉयफ्रेंड राहुल बोसला भेटायला जात आहे, परंतु ती नंतर घरी परत आलीच नाही. रात्री उशिरा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फेसबुक पोस्ट करण्यात आली, जी पाहिल्यावर कुटुंबाची चिंता वाढली. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. मी स्वत:च यासाठी जबाबदार आहे. तुम्ही सर्वजण नीट राहा असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
गुरुवारी कोलकाता पोलीस आणि सीआयडीचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. आरोपी राहुल बोसला न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तरुणीचं त्याच्याशी बोलणं झाल्याचं आरोपी राहुल बोसने सांगितलं. भेटण्याबाबतही चर्चा झाली होती, पण ती त्याला भेटली नाही असंही त्याने म्हटलं.