शेतकऱ्याचे १ लाख ८० हजार रुपये लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 11:54 IST2021-07-20T11:54:37+5:302021-07-20T11:54:42+5:30

Crime News : जमिनीच्या व्यवहारातून मिळालेली दोन लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम होती.

1 lakh 80 thousand rupees were looted from the farmers | शेतकऱ्याचे १ लाख ८० हजार रुपये लुटले

शेतकऱ्याचे १ लाख ८० हजार रुपये लुटले

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : दुचाकीला दुचाकीने धडक मारून शेतकऱ्याचे १ लाख ८० हजार रुपये लुटल्याची घटना १९ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता रिसोड ते शेलू खडसे मार्गावर घडली. या घटनेत एक वृद्ध महिला जखमी झाली.
रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील बबनराव लक्ष्मण सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीचे व्यवहार करून रिसोड येथून सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान ते गावाकडे जाण्याकरीता निघाले होते. त्यांच्याजवळ जमिनीच्या व्यवहारातून मिळालेली दोन लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम होती. यातील एक लाख ८० हजार रुपयांची रक्कम त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत तर उर्वरित रक्कम खिशात ठेवली. गावाकडे जाताना सोबत दुचाकीवर त्यांची आई प्रयागबाई व दिव्यांग भाऊ माणिकसुद्धा होते. हे तिघे दुचाकीने शेलू खडसे मार्गे जात असताना रस्त्यात समोरून एका अज्ञात दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर लगेच अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी गाडीची डिकी फाेडून एक लाख ८० हजार रुपये घेऊन तेथून पळ काढला. या घटनेत बबनराव सानप यांच्या आई प्रयागबाई यांच्या डोक्याला व पायाला मार लागला असून त्यांचे भाऊ माणिक यांना किरकोळ मार लागला. 
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: 1 lakh 80 thousand rupees were looted from the farmers