सांघिक कामगिरीच्या जोरावर मिळविला मालिका विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 03:15 AM2019-10-23T03:15:42+5:302019-10-23T06:10:32+5:30

दक्षिण आफ्रिकेला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीनस्वीप देत, भारताने सर्वांना दाखवून दिले की, घरच्या मैदानावर टीम इंडिया किती मजबूत आहे.

Series win on the strength of team performance | सांघिक कामगिरीच्या जोरावर मिळविला मालिका विजय

सांघिक कामगिरीच्या जोरावर मिळविला मालिका विजय

Next

- अयाझ मेमन

दक्षिण आफ्रिकेला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीनस्वीप देत, भारताने सर्वांना दाखवून दिले की, घरच्या मैदानावर टीम इंडिया किती मजबूत आहे. या विजयासह भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतही आपले अव्वल स्थान भक्कम केले. या मालिकेतील भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे, संघातील प्रत्येक खेळाडूने आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या वाटचालीमध्ये कोणतीही कमजोरी किंवा अपयश नव्हते. या मालिकेतील कामगिरीच्या आधारे सादर केलेले भारतीय खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड...

रोहित शर्मा (१०/१०)

कसोटी कारकिर्द नाजूक वळणावर असताना रोहितला डावाची सुरुवात करण्यास सांगितले. ही संधी साधताना मर्यादित षटकांच्या या ‘हिटमॅन’ने सुपरहिट कामगिरी केली. दोन शतके आणि एका द्विशतकासह ५०० हून अधिक धावा करत रोहितने स्वत:ला सिद्ध केले. त्याने आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने फटकेबाजी केली.

मयांक अगरवाल (८/१०)

गेल्या वर्षी आॅस्टेÑलियाविरुद्ध मिळालेल्या संधीनंतर मयांकने अल्पावधीत लक्षवेधी कामगिरी केली. त्याच्याकडे तंत्र असून सर्वात महत्त्वाचे दीर्घ खेळीसाठी संयम आहे. रोहितसह जबरदस्त ताळमेळ साधत त्याने चांगली सलामी दिली.

चेतेश्वर पुजारा (६/१०)

आघाडीच्या फळीतील सर्वच फलंदाज धावा फटकावत असताना पुजाराकडून म्हणावी तशी अपेक्षित कामगिरी झाली नाही, पण त्याने प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोन अर्धशतके झळकावली.

विराट कोहली (९/१०)

दुसऱ्या कसोटीतील तुफानी २५४ धावांच्या द्विशतकी खेळाच्या जोरावर कोहलीने मालिकेत धावांचा डोंगर रचला, पण फलंदाजीपेक्षा आक्रमक नेतृत्वामुळे तो प्रभावी वाटला. संघासाठी जास्तीतजास्त गुण मिळविण्याच्या प्रयत्नात तो नेहमीच आक्रमक दिसला.

अजिंक्य रहाणे (८/१०)

मोठ्या काळानंतर अजिंक्यने आपल्या लौकिकानुसार खेळ केला. मधल्या फळीतील त्याच्या भक्कम खेळामुळे दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी कधीही मजबूत किंवा सर्वोत्तम दिसली नाही. त्याने परिस्थितीनुसार खेळताना एक दमदार शतक झळकावले.

रवींद्र जडेजा (८.५/१०)एक अष्टपैलू म्हणून जडेजाने या मालिकेचा पूर्ण आनंद घेतला. सहाव्या क्रमांकावर बढती दिल्यानंतर त्याने दोन

अर्धशतकांसह २०० हून अधिका धावा काढत आपल्या फलंदाजीतील प्रगती दाखवून दिली. डावखुरी आॅफस्पिन गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणासह त्याने आपली छाप पाडली.

रिद्धिमान साहा (७.५/१०)

दीर्घ काळानंतर साहाने दुखापतीतून पुनरागमन केले. त्याने कसोटी क्रिकेटमधील यष्टीरक्षणाचे तंत्र दाखवतानाच तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून दिले. त्याच्यामुळे वेगवान आणी फिरकी गोलंदाजांनी मोकळेपणाने मारा केला, शिवाय त्याने काही अप्रतिम झेल घेत सर्वांचे लक्ष वेधले.

रविचंद्रन अश्विन (८/१०)

अश्विनने १५ बळी घेत भारतीय खेळपट्ट्यांवर आपण का धोकादायक आहोत हे पुन्हा दाखविले. कायम आक्रमक आणि निडरपणे मारा करताना त्याने आपल्या गोलंदाजीत विविधता राखले.

इशांत शर्मा (६/१०)
इशांतने दोन सामन्यांतून दोन बळी घेतले, पण या आकडेवारीतून त्याने किती चांगला मारा केला हे दिसून येत नाही. त्याने नियंत्रित मारा करताना चेंडू स्विंगही केला. नव्या चेंडूसह इनस्विंग मारा करताना त्याने आपली भेदकता दाखविली.

मोहम्मद शमी (८.५/१०)

स्टार वेगवान गोलंदाज. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत शमीला इशांतसह सुरुवातीला बळी मिळाले नाहीत, पण त्याने सातत्याने अचूक टप्प्यावर मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना दबावाखाली ठेवले.

उमेश यादव (८/१०)

उमेशच्या यशामुळे भारताची बेंच स्टेंथ किती मजबूत आहे हे कळले. केवळ इशांतला विश्रांती मिळावी, म्हणून उमेशला संधी मिळाली, पण त्याने संधी साधताना २ कसोटींतून ११ बळी घेत अंतिम संघातील स्थान मजबूत केले.

शाहबाझ नदीम (८/१०)

अखेरच्या कसोटीत कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाल्याने नदीमला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील प्रदीर्घ अनुभव असल्याने कसोटी पदार्पणात तो नर्व्हस दिसला नाही. पहिल्या डावात बळी घेतले, शिवाय दुसºया डावातही अखेरचे दोन बळी घेत त्याने भारताच्या विजयावर शिक्का मारला. पुढील सामन्यांसाठी त्याला बाहेर बसविणे कठीण झाले आहे. (लेखक लोकमतचे कन्सल्टिंग एडिटर आहेत.)

Web Title: Series win on the strength of team performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.