छत्तीसगडचेमुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. एक तर काम करा नाहीतर, निलंबित होण्यासाठी तयार रहा, असा दमच त्यांनी दिला. हे घडलं चुकतीपानी गावात. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अचानक गावाला भेट दिली. गावकऱ्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी त्यांना गावातील पाण्याच्या समस्येबद्दल कळले. त्यांनी अधिकाऱ्याला बोलावलं आणि फैलावर घेतलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदे साय यांनी गौरेला-पँड्रा-मरवाही जिल्ह्यातील चुकतीपानी गावाला अचानक भेट दिली. मुख्यमंत्री साय हेलिकॉप्टरने गावात गेले. हेलिकॉप्टर बघून ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री साय यांनी ग्रामस्थांशी गावातच बैठक घेतली.
शासकीय योजनांबद्दल ग्रामस्थांकडून घेतली माहिती
मुख्यमंत्री साय यांनी ग्रामस्थांकडे शासकीय योजनांबद्दल चौकशी केली. ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी लगेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले.
मुख्यमंत्री साय यांनी उपअभियंत्याला गावातील हातपंपाची संख्या आणि जलजीवन मिशनबद्दल माहिती विचारली. त्यानंतर ग्रामस्थांनाही विचारले. उपअभियंता समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.
मुख्यमंत्री विष्णुदे साय यांचा चढला पारा
अभियंत्याला माहिती देता न आल्याने मुख्यमंत्री साय चांगलेच भडकले. ते अधिकाऱ्यांना म्हणाले, 'हे सरकारी काम आहे. थट्टा मस्करी चाललेली नाही. काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा.'
मुख्यमंत्री साय यांचे हे रुप बघून अधिकाऱ्यांची तंतरली. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सर्वांसमोर अधिकाऱ्यांना कामावरून सुनावल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
याचवेळी गावातील पाण्याच्या टाकीतून पाणी वाया जात असल्याचेही मु्ख्यमंत्री साय यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वाया जात असलेल्या पाण्याबद्दलही अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली.