जि.प. सदस्यांचे प्रशिक्षण गुंडाळले
By Admin | Updated: July 19, 2014 00:40 IST2014-07-18T23:40:24+5:302014-07-19T00:40:41+5:30
बीड:पंचायतराज सशक्तीकरण अभियानांतर्गत शुक्रवारी येथे जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. मात्र पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे प्रशिक्षण उद्घाटन सत्रानंतर गुंडाळावे लागले.
जि.प. सदस्यांचे प्रशिक्षण गुंडाळले
बीड:पंचायतराज सशक्तीकरण अभियानांतर्गत शुक्रवारी येथे जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. मात्र पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे प्रशिक्षण उद्घाटन सत्रानंतर गुंडाळावे लागले.
शासकीय योजना, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयांचे कामकाज या संदर्भात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार होते. त्यासाठी यशदा मार्फत तज्ज्ञ मार्गदर्शकांना पाचारण केले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभही झाला. यावेळी जि.प. अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, सभापती गयाबाई आवाड, सदस्य महेंद्र गर्जे एवढेच पदाधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षण सुरू होण्याची वेळ आली तरीही सदस्य फिरकलेच नाहीत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. भारती यांच्यावर प्रशिक्षण रद्द करण्याची नामुष्की ओढावली. प्रशिक्षणाचा उद्घाटन कार्यक्रम दिमाखात पार पडला खरा; पण पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे दोन दिवसीय प्रशिक्षण दोन तासातच गुंडाळावे लागले.
दरम्यान याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. भारती यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी निमंत्रण दिले होते. मात्र पदाधिकारी आले नाहीत. शासनाचा पैसा व्यर्थ खर्ची जाऊ नये म्हणून प्रशिक्षण थांबवावे लागले. पदाधिकारी का आले नाहीत हे मला सांगता येणार नाही. (प्रतिनिधी)
पंचायत राज सशक्त करण्यासाठी ठेवण्यात आलेले दोन दिवसीय प्रशिक्षण जिल्हा परिषद सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे दोन तासातच गुंडाळावे लागले
एकूण सदस्यांपैकी मोजकेच राहिले उपस्थित