मानवत : ऊसतोडीच्या मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून अंबेगाव येथील एका युवकाच्या अंगावर विषारी द्रव्य टाकण्यात आले़ हे द्रव्य अंतरप्रवाही असल्याने ते रक्तामध्ये जाऊन या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली़ याप्रकरणी तीन जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा मानवत पोलिसांनी दखल केला आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबेगाव येथील विठ्ठल नारायण मुठाळ (वय २५), केकरजवळा येथील किशन शंकर पुरी, उद्धव शंकर पुरी आणि मानोली येथील गजानन माणिक मांडे यांचे गतवर्षीच्या ऊसतोड हंगामातील मजुरीच्या पैशाचे आर्थिक व्यवहार होते़ २१ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ८़३० च्या दरम्यान, विठ्ठल मुठाळ हा युवक मजुरीचे पैसे मागण्यासाठी केकरजवळा येथे पुरी यांच्याकडे गेला होता़ यावेळी त्याने किशन शंकर पुरी यांना पैशाची मागणी केली़ परंतु, किशन पुरी, उद्धव पुरी व गजानन मांडे या तिघांनी संगनमत करून विठ्ठल मुठाळ यास पैसे देण्यास टाळाटाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली़ त्यानंतर मुठाळ यांच्या अंगावर व तोंडावर आरोपीने विषारी द्रव्य फेकले़ सदरील विषारी द्रव्य अंतरप्रवाही असल्याने ते शरीरात गेले़ उपचारासाठी मुठाळ यांना परभणी येथील दवाखान्यात हलविले असता, उपचारादरम्यान मुठाळ यांचा मृत्यू झाला़ या बाबतची फिर्याद दत्ता नारायण मुठाळ यांनी मानवत पोलिस ठाण्यात दिली़ त्यावरून तिन्ही आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि अविनाश खंदारे हे करीत आहेत़
युवकाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा नोंद
By admin | Updated: December 23, 2015 23:42 IST