नशेच्या दलदलीत तरुणाई; मद्यासोबतच कोकेन, बटण, एमडी, व्हाइटनर, गांजाची चटक
By संतोष हिरेमठ | Updated: August 14, 2025 18:50 IST2025-08-14T18:41:14+5:302025-08-14T18:50:01+5:30
मद्यापेक्षा इतर पदार्थांच्या व्यसनांमुळे केंद्रांत दाखल होणारे अधिक; पस्तीशीच्या आतील अधिक

नशेच्या दलदलीत तरुणाई; मद्यासोबतच कोकेन, बटण, एमडी, व्हाइटनर, गांजाची चटक
छत्रपती संभाजीनगर : व्यसन म्हटले की, फक्त मद्यपान, अशी स्थिती आता नाही. कारण शहरात मद्यपानाशिवाय इतर व्यसनांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. परिणामी, शहरात व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या वाढली आहे. व्यसनामुळे प्रकृती खालावल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये आणि व्यसन सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांत दाखल होणाऱ्यांमध्ये इतर पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. चिंताजनक म्हणजे यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे.
मानसिक आरोग्य आढावा मंडळाअंतर्गत शहरातील व्यसनमुक्ती केंद्रांची नोंदणी होते. जिल्हा रुग्णालयातील मनोविकार विभागप्रमुख डाॅ. जितेंद्र डोंगरे म्हणाले, व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. व्यसनाच्या पद्धतीही बदलल्या आहेत. एमडी ड्रग, व्हाइटनर इ.चे व्यसन वाढत आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची वेळोवेळी पाहणी केली जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले.
शहरातील व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या-१७
याचे वाढले व्यसन
मनोरुग्णांच्या उपचारासाठी देण्यात येणाऱ्या गोळ्या या ‘बटण’ नावाने चर्चेत आहेत. यांचे सेवन तरुणाईत वाढले आहे. कारण या गोळ्या खाल्ल्यानंतर कोणताही वास येत नाही. त्यामुळे मुलेही हे व्यसन करीत आहेत. त्याबरोबरच एमडी, कॅनाबिस, कोकेन, ब्राऊन शुगर, इंजे. पेंटाझोसीन, स्टिकफास्ट, व्हाइटनरचे व्यसन अधिक आहे.
३० टक्के रुग्ण मद्यपी, ७० टक्के इतर व्यसनी
शहरातील एका व्यसनमुक्ती केंद्रात महिनाभरात ६२ रुग्ण दाखल झाले. यात ३० टक्के रुग्ण मद्यपान करणारे होते. ७० टक्के रुग्ण हे ‘बटण’, चिकटवण्याचे द्रव, गांजा इ.चे व्यसन करणारे होते.
एकाच वेळी १० ते १५ गोळ्या
व्यसनाचे प्रमाण व्यक्तीमध्ये वाढल्यानंतर एकाचवेळी १० ते १५ ‘बटण’ गोळ्या खातात. गोळ्यांसोबत किमान दोन ते तीन अमली पदार्थ एकत्र करून सेवन करण्याचा प्रकारही होतो.
इतर व्यसन वाढले
उपचारासाठी दाखल होणाऱ्यांमध्ये मद्यपी रुग्णांचे प्रमाण ४० टक्के आहे. इतर व्यसनांच्या रुग्णांचे प्रमाण हे ६० टक्के आहे. एमडी, कॅनाबिस, कोकेन, ब्राऊन शुगर, इंजे. पेंटाझोसीन, चिकटवण्याचे द्रव, व्हाइटनरचे व्यसन वाढत आहे.
- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ.
तरुणाईचे प्रमाण अधिक
व्यसन सुटण्यासाठी दाखल होणाऱ्यांमध्ये १८ ते ३५ या वयोगटाचे म्हणजे तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकाच वेळी १० ‘बटण’ खाणारेही येतात. इतर व्यसने करणारेही येतात.
- डाॅ. सुनील नागरगोजे, व्यसनमुक्ती केंद्र चालक.