परळी तालुक्यात तलाठ्यांची तेरा पदे रिक्त

By Admin | Updated: August 10, 2014 02:22 IST2014-08-10T01:58:52+5:302014-08-10T02:22:42+5:30

परळी: शेतकऱ्यांची विविध कामे तलाठ्याकडे असतात. मात्र परळी तालुक्यात आजही अनेक पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबत आहे.

Your posts are empty in Parli taluka | परळी तालुक्यात तलाठ्यांची तेरा पदे रिक्त

परळी तालुक्यात तलाठ्यांची तेरा पदे रिक्त




परळी: शेतकऱ्यांची विविध कामे तलाठ्याकडे असतात. मात्र परळी तालुक्यात आजही अनेक पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबत आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
परळी तालुक्यात १०६ गावे असून २९ तलाठी सज्जे आहेत. यापैकी केवळ १६ सज्जावरच तलाठी नियुक्त केलेले आहेत. बाकी १३ पदे रिक्त असल्याने या १६ तलाठ्यांवरच अतिरिक्त कारभार सोपविला जात आहे. मागील महिनाभरापासून पीक विम्यासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची झुंबड उडत होती. मात्र तलाठी पदे रिक्त असल्याने व उपस्थित तलाठ्यांवर अतिरिक्त कारभार सोपविल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबत होती. एकाच दिवसात होणाऱ्या कामासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना तीन ते चार वेळेस चकरा माराव्या लागत होत्या.
विशेष म्हणजे जी तलाठी कार्यालये आहेत अशा कार्यालयांसाठी पुरेशी जागाही उपलब्ध नसल्याने अनेक कामे खोळंबत होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उपलब्ध असलेले तलाठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात होता. ही पदे अनेक महिन्यांपासून रिक्त असून याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कारभार सोपविल्यामुळे ताण येत आहे.
कामाचा जादा ताण येत असल्यामुळे तलाठ्यांची मानसिक स्थिती योग्य राहत नसल्याचे दिसून येत आहे. १०६ गावांसाठी केवळ १६ तलाठी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरापासून पदे रिक्त असली तरी ते भरण्यासाठी वरिष्ठांना कुठलेही गांभिर्य नसल्याचे आरोप केला जात आहे. २९ तलाठी सज्जाचा कारभार १६ तलाठ्यांवर असल्याने एका तलाठ्यावर ९ गावांचा कामाचा ताण येत आहे. वाघाळ्याचे तलाठी विठ्ठल पंडित यांच्याकडे वाघाळा व नंदागौळ अशा दोन तलाठी सज्जांचा कारभार आहे. या दोन तलाठी सज्जांतर्गत सात गावांचा समावेश आहे. अशीच परिस्थिती बेलंब्याचे तलाठी सतीश भुसेवाड यांच्या बाबतीत आहे. बेलंबा व दैनापूर या दोन तलाठ्यांचा कारभार त्यांच्याकडे आहे.
तलाठ्यांची संख्या कमी असल्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत परळीच्या उपजिल्हाधिकारी सविता चौधर म्हणाल्या, ही पदे भरण्यासाठी वरिष्ठांकडे आम्ही मागणी केलेली आहे. या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावाही केला जात आहे.
आठ बाय आठ च्या खोलीतच चालतो पंधरा गावांचा कारभार
नंदागौळ व बेलंबा या दोन तलाठी सज्जांचे कार्यालय केवळ आठ बाय आठच्या खोलीत आहेत. तलाठी कार्यालयासाठी कमी जागा असल्याने तलाठ्यांना काम करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच शेतकऱ्यांनाही ताटकळत उभे रहावे लागत आहेत. मागील महिन्यात पीक विम्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. हे तलाठी उशिरा सज्जावर येत असल्याने काही शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला होता. अनेक वेळा मागणी करूनही ही पदे अद्यापही भरलेली नाहीत. (वार्ताहर)

Web Title: Your posts are empty in Parli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.