जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:05 IST2019-01-03T18:02:23+5:302019-01-03T18:05:56+5:30
पिडीतेचा बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचेही समोर आले आहे.

जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार करणारा अटकेत
औरंगाबाद : ओळखीच्या महाविद्यालयीन तरूणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर सतत अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुंडलिनकर पोलिसांनीअटक केली. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिचा बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचेही समोर आले आहे.
हनुमान भास्कर वीर (रा. हनुमाननगर,सिडको एन-३) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितंले की, आरोपी हनुमान हा एका शिक्षण संस्थेतील पदविका कोर्ससाठी बहिस्थ विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत आहे. पीडितेच्या कॉलनीमध्ये हनुमानचे मित्र राहतात. मित्रांना भेटण्यासाठी हनुमान हा सतत त्यांच्या घरी जात असे. या दरम्यान पीडितेसोबत त्याची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मे महिन्यात तो पीडितेला घेऊन हनुमाननगर येथील त्याच्या खोलीवर आला. तेथे त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर प्रथम अत्याचार केला. त्यानंतर तो तिच्यावर सतत अत्याचार करू लागला.
दरम्यान, पीडितेला गर्भधारणा राहिल्याचे त्यास समजल्यानंतर त्याने तिला पुन्हा धमकावून बळजबरीने तिच्या गर्भपात घडवून आणला. पीडितेने गर्भपात करावा, यासाठी त्याने तिला शिवीगाळ करून मारहाणही केली होती. तो सतत तिला जीवे मारण्याची धमकी देत असे. त्याच्याकडून होणारा त्रास दिवसेंदिवस वाढतच असल्याने पीडितेने अत्याचाराचा पाढा नातेवाईकांसमोर वाचला. त्यानंतर नातेवाईक पीडितेला सोबत घेऊान थेट पुंडलिकनगर ठाण्यात दाखल झाले. पुंडलिकनगर ठाण्यात त्यांनी आरोपी हनुमानविरोधात गुन्हा नोंदविला. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी हनुमानला अटक केली.
७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
आरोपी हनुमान याच्याविरोधात बुधवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक व्ही.बी. कापसे आणि कर्मचाऱ्यांनी झटपट कारवाई करीत हनुमानला त्याच्या खोलीतून अटक केली. न्यायालयाने आज त्यास ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.