तरुणीने वनरक्षक परीक्षेचे ग्राऊंड दिले, परत येताना हायवाने चिरडले; बहिणीसह २ भावांचा मृत्यू
By सुमित डोळे | Updated: February 8, 2024 14:01 IST2024-02-08T14:01:06+5:302024-02-08T14:01:50+5:30
सरकारी नोकरीचे स्वप्न साकार होण्यास केवळ एक टप्पा बाकी असताना काळाचा घाला

तरुणीने वनरक्षक परीक्षेचे ग्राऊंड दिले, परत येताना हायवाने चिरडले; बहिणीसह २ भावांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर: शेंद्रा येथे वनरक्षक लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे पदासाठी ग्राऊंड सुरू आहे. येथे मैदानी चाचणी देऊन परत येताना दुचाकीवरील तरुणी आणि तिच्या दोन भावांना भरधाव हायवाने चिरडल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता बीडबायपास येथे गुरु लॉन्ससमोर घडली.या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता.
प्रतिक्षा भगवान अंभोरे ( २२), प्रदीप उर्फ लखन भगवान अंभोरे ( २५) आणि प्रवीण भगवान अंभोरे ( २८, हल्ली मुक्काम सातारा) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, प्रतीक्षा आणि प्रदीप ही दोघे जिंतूर तालुक्यातील अकुली या गावात राहतात. तर त्यांचा मोठा भाऊ प्रवीण सातारा परिसरात राहतो. प्रतीक्षाने वनरक्षक पदाची लेखी परीक्षा पास झाली आहे. मैदानी चाचणीसाठी ती बुधवारी रात्री जिंतूर येथून मोठा भाऊ प्रदीपसोबत छत्रपती संभाजीनगर येथे प्रवीणच्या घरी थांबली. मैदानी चाचणीसाठी प्रवीण याने प्रतीक्षा आणि प्रदीपला एकाच दुचाकीवर आज सकाळी शेंद्रा येथे नेले. चाचणी झाल्यानंतर तिघे एकाच दुचाकीवर परत सातारा परिसरात परत येत होते.
दरम्यान, बीडबायवरील गुरु लॉन्ससमोर भरधाव हायवाने तिघांना पाठीमागून जोरदार धडक दिली. खाली पडलेल्या तिघांच्या अंगावरून हायवा गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी तिघांच्या रक्ताचा सडा पडलेला होता. सरकारी सेवेत रुजू होण्याचा केवळ एक टप्पा बाकी असताना तरुणीचा अपघाती मृत्यू झाला.तर बहिणीचे स्वप्न साकार करण्यासाठी घडपडणाऱ्या दोन्ही भावांना देखील काळाने हिरावले आहे.तीन कर्ते एकाच वेळी मृत्यूने दुरावल्याने अंभोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.