व्वा! जालना- मनमाड रेल्वेमार्ग फुल ‘चार्ज’, कधीही धावू शकेल इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे
By संतोष हिरेमठ | Updated: July 18, 2023 17:02 IST2023-07-18T17:00:19+5:302023-07-18T17:02:22+5:30
जालना ते मनमाड विद्युतीकरण पूर्ण; आधी मालगाडी, नंतर प्रवासी रेल्वे धावणार विजेवर

व्वा! जालना- मनमाड रेल्वेमार्ग फुल ‘चार्ज’, कधीही धावू शकेल इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे
छत्रपती संभाजीनगर : बहुप्रतीक्षित मनमाड (अंकाई) ते जालना या १६१ कि.मी. रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण अखेर पूर्ण झाले आहे. या संपूर्ण रेल्वेमार्गावर रेल्वेची विद्युतीकरणाची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेससह विविध रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनसह धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाकडून सोमवारी दिनेगाव ते जालना या ८ कि.मी. रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आणि संपूर्ण मनमाड (अंकाई) ते जालना रेल्वेमार्ग विद्युतीकरणासह सज्ज झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. जालन्याहून प्रारंभी इलेक्ट्रिक इंजिनसह मालगाडी धावतील. त्यानंतर प्रवासी रेल्वे धावतील, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सहा महिन्यांत केले विद्युतीकरण
मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी. रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण जानेवारीत पूर्ण झाले होते. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांत आता छत्रपती संभाजीनगर ते जालना रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले.
‘जनशताब्दी’ला पहिला ग्रीन सिग्नल
जनशताब्दी एक्स्प्रेस ही जालन्याहून धावते. त्यामुळे सगळ्यात आधी जनशताब्दी एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनसह चालविण्याची तयारी रेल्वेकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याबरोबर मुंबईकडे जाणाऱ्या विविध रेल्वे टप्प्याटप्प्याने विजेवर धावतील, असेही सांगण्यात आले.