चिंताजनक ! खाटांसाठी शोधाशोध, शहरापेक्षाही भयावह वेगाने वाढतोय ग्रामीणचा कोरोना रुग्ण आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 13:49 IST2021-04-20T13:41:43+5:302021-04-20T13:49:42+5:30
corona virus speads faster in rural area गंभीर रुग्णांना शहरात यावे लागत असून, त्यांना खाटा उपलब्ध करुन देण्यात अडचणी निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले.

चिंताजनक ! खाटांसाठी शोधाशोध, शहरापेक्षाही भयावह वेगाने वाढतोय ग्रामीणचा कोरोना रुग्ण आलेख
औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख वाढतच असून, सक्रिय रुग्णसंख्याही वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. गेल्या ६ दिवसात ८,८१६ बाधितांची जिल्ह्यात भर पडली आहे. त्यातील शहरात ४,२६३ तर ग्रामीण भागात तब्बल ४,५५३ रुग्ण आढळले. दररोजच्या रुग्णवाढीतही शहरालगतच्या गावांमधील बाधित रुग्णसंख्येचा टक्का वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
पहिल्या लाटेत ग्रामीण भागात शहरालगतची व बाजारपेठांची गावे वगळता फारसे संक्रमण झाले नव्हते. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीणचा आकडा कायमच कमी होता. मात्र, गेल्या आठवडाभरात सातत्याने शहरापेक्षा ग्रामीणमध्ये बाधित अधिक संख्येत आढळून येत आहेत. त्यातही गंभीर झालेले रुग्ण ग्रामीण भागातून शहरात संदर्भित होत असताना बेडची शोधाशोध करताना नातेवाईकांची दमछाक होत आहे. बाधितांचा शोध, तपासणी आणि लसीकरण करुन घेण्यासाठी ग्रामदक्षता समित्या नेमल्या गेल्या. मात्र, लसींचा आवश्यक तेवढा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाची टक्केवारी घसरल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी दिली.
जिल्ह्यात ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत. तिथे आवश्यक खाटा आहेत. मात्र, गंभीर रुग्णांना शहरात यावे लागत असून, त्यांना खाटा उपलब्ध करुन देण्यात अडचणी निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले. ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच असून, सचिव ग्रामसेवक, सरपंचाच्या मदतीला या समितीत मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीसपाटील, आशाताई, अंगणवाडी सेविका, कृषिसेवक, बीएलओ आदी कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायदे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. त्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सरपंच, उपसरपंचाला नोटीस
कोरोना काळात कर्तव्य पार पाडणाऱ्या डॉक्टरला मारहाण आणि परिचारिकेला शिवीगाळ करणाऱ्या सरपंच व उपसरपंचांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी नोटीस पाठवली आहे. तसेच असे गैरवर्तन शोभनीय नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल असून, कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी सांगितले.
दिनांक - शहर - ग्रामीण
१३ एप्रिल - ८१३ - ५३९
१४ एप्रिल - ७७१ - ९४७
१५ एप्रिल - ७६७ - ५६२
१६ एप्रिल - ६३८ - ७५०
१७ एप्रिल - ६१८ - ९८२
१८ एप्रिल - ६५६ - ७७३
एकूण - ४२६३ - ४५५३