तडजोडीतून पुन्हा संसार फुलला

By Admin | Updated: December 19, 2014 00:57 IST2014-12-19T00:49:17+5:302014-12-19T00:57:07+5:30

बाळासाहेब जाधव , लातूर किरकोळ कारणांवरून एकमेकांपासून विभक्त झालेल्या १५९ दाम्पत्यांचा पुन्हा संसार फुलविण्यात महिला तक्रार निवारण कक्षाला यश आले आहे.

The world over again by compromise | तडजोडीतून पुन्हा संसार फुलला

तडजोडीतून पुन्हा संसार फुलला


बाळासाहेब जाधव , लातूर
किरकोळ कारणांवरून एकमेकांपासून विभक्त झालेल्या १५९ दाम्पत्यांचा पुन्हा संसार फुलविण्यात महिला तक्रार निवारण कक्षाला यश आले आहे. दुभंगलेली मने जुळविण्यासाठी महिला तक्रार निवारण कक्षाने अनेकदा समुपदेशन करून या दाम्पत्यांचा संसार सुरळीत केला आहे.
महिला तक्रार निवारण केंद्राअंतर्गत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ़ ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. लक्ष्मण चव्हाण हे गेल्या ३ वर्षांपासून जिल्ह्यातील भांडणे झालेल्या कुटुंबातील वाद या कार्यालयाच्या माध्यमातून मार्गी लावत आहेत़ या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातील नागरिक आपल्या कुटुंबातील वाद मिटविण्यासाठी या केंद्रात येतात़ चालू वर्षात २०१३-१४ मध्ये ५४२ तक्रारी जिल्हा महिला तक्रार निवारण केंद्राकडे दाखल झाल्या आहेत. ५४२ प्रकरणांपैकी १५९ कुटुंबांतील वाद मिटविण्यात आले आहेत. आता हे जोडपे सुखाने संसार करीत आहेत. अधूनमधून महिला तक्रार निवारण कक्षातील कर्मचाऱ्यांकडून संसारात रमलेल्या या जोडप्यांची भेट घेतली जाते. पुन्हा पुन्हा समुपदेशन करून त्यांच्या संसारात विघ्न येऊ नये म्हणून महिला तक्रार निवारण कक्ष खबरदारी घेत आहे. उर्वरित ३८३ जोडप्यांचे समुपदेशन केले जात आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक जोडप्यांचा काही दिवसांतच दुभंगलेला संसार फुलेल, अशी अपेक्षाही पोहेकॉ. लक्ष्मण चव्हाण यांनी व्यक्त केली.
भांडणामध्ये तडजोडी झाल्यानंतरही नांदायचं नाही, पोटगी द्यावी, या कारणासाठी कौटुंबिक भांडणे वाढत गेली तर दिवाणी दावे दाखल करुन न्यायालयामार्फत दाद मिळविण्याचे काम संबंधित जोडपे करीत असतात़ परंतु, या केंद्राच्या माध्यमातून मात्र तडजोडीची भूमिका आहे. न्यायालयीन प्रकरणांत तडजोडी नसतात. थेट विभक्त होऊन पोटगीचा दावा केला जातो. इथे मात्र विभक्त झालेले दोन मनं जोडण्याचा प्रयत्न होतो. गेल्या वर्षभरात १५९ जोडप्यांचा संसार जोडण्यात यश आले आहे. ४
गेल्या वर्षात जिल्ह्यातील कौटुंबिक तक्रारींची संख्या ४४१ होती़ तर यावर्षी हा आकडा ५४२ वर गेला आहे़ त्यामुळे तक्रारीमध्ये गतवर्षीच्या प्रमाणात १०० ची वाढ झाली आहे़
४या तक्रारीमध्ये उदगीर आणि अहमदपूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भांडणावरून वेगळे झालेल्या पती-पत्नीची समोरासमोर भेट घडवून तडजोडीचा प्रयत्न सतत केला जातो. याऊपरही काही प्रकरणांत तडजोड न झाल्यास त्यांच्या तक्रारीनुसार संबंधित पोलिसात गुन्हा दाखल केला जातो.
४नवरा-बायकोच्या भांडणात ४९८ चा गुन्हा दाखल होऊ नये. त्यांच्यात प्रथमत: तडजोडच व्हावी म्हणून महिला तक्रार निवारण कक्ष कसोशीने प्रयत्न करतो.

Web Title: The world over again by compromise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.