छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिकमध्ये CII चे स्किल सेंटर; DMIC ला कुशल मनुष्यबळाचे 'बुस्टर'
By बापू सोळुंके | Updated: July 14, 2025 14:55 IST2025-07-14T14:47:34+5:302025-07-14T14:55:01+5:30
ऑरिक हॉलमध्ये सीआयआयचे कौशल्य विकास केंद्र दरवर्षी २२०० विद्यार्थ्यांना देणार प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिकमध्ये CII चे स्किल सेंटर; DMIC ला कुशल मनुष्यबळाचे 'बुस्टर'
छत्रपती संभाजीनगर : दिल्ली, मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी)मध्ये विविध कंपन्यांनी ८४ हजार ७६१ कोटींची गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन ते चार वर्षांत हे उद्योग उत्पादन सुरू करतील. या उद्योगांना तसेच स्थानिक उद्योगांना आवश्यक असे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीला शेंद्रा येथील ऑरिक हॉलमध्ये जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र (मल्टी मॉडेल स्किल सेंटर) सुरू करण्यासाठी २० हजार चौरस फूट जागा देण्यात आली. वर्षभरात हे सेंटर कार्यान्वित होणार असल्याची माहिती सीआयआयकडून मिळाली. दरवर्षी सुमारे २२०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात टोयटा - किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी, एथर एनर्जी, लुब्रिझोल, पिरॅमल फार्मा यांसह सुमारे ३१० उद्योगांनी गुंतवणुकीचा निर्णय गतवर्षी जाहीर केला. या कंपन्यांना ऑरिकमध्ये भूखंड वाटप करण्यात आले आहेत. या कंपन्यांमुळे ४७ हजार ३५८ लोकांना प्रत्यक्ष; तर १ लाख ५० हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील. येथे गुंतवणुकीची घोषणा करणाऱ्या कंपन्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) या उद्योजकांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने ऑरिक सिटीमध्ये कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना दिला होता, तेव्हा त्यांनी या प्रस्तावाला लगेच मान्यता देत पुढील कार्यवाहीचे निर्देश राज्य सरकारला दिले.
केंद्रीय उद्योग व अंतर्गत व्यवहार विभागाचे सचिव अमरदीपसिंग भाटिया, राज्याचे उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगण, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर यांच्यासह अन्य अधिकारी रविवारी ऑरिकमध्ये एका बैठकीसाठी आले हाेते. तेव्हा सीआयआयचे मराठवाडा अध्यक्ष सुनील किर्दक यांनी त्यांना निवेदन दिले. तेव्हा ऑरिक हॉलमध्ये २० हजार चौरस फुटांची जागा सीआयआयच्या कौशल्य विकास केंद्रासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुढील आठवड्यात सामंजस्य करार
कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात सीआयआय आणि महाराष्ट्र इंडस्ट्रिअल टाउनशिप लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार असल्याचे केंद्रीय उद्योग व अंतर्गत व्यवहार विभागाचे सचिव अमरदीपसिंग भाटिया यांनी सांगितले.
ऑरिक सिटी संक्षिप्त
प्रत्यक्ष उत्पादन असलेल्या कंपन्या - ८०
बांधकाम प्रगतिपथावर असलेल्या कंपन्या - ४८
सूक्ष्म व लघुउद्योगांना भूखंड वाटप - १८५
ऑरिक बिडकीन येथे एमएसएमईसाठी राखीव जमीन - २५० एकर
आतापर्यंतची गुंतवणूक - ८४ हजार ७६१ कोटी
किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार? दरवर्षी २२००