World Blood Donor Day : ४३ वर्षांपासून नियमित रक्तदान करणारे बिपीन निर्मळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:20 IST2018-06-14T16:19:27+5:302018-06-14T16:20:31+5:30
दुर्मिळ व सर्व प्रकारचे रक्तगट असलेले दाते समाजात अधिकाधिक तयार करून त्यांच्याकडून रक्तदान व्हावे, यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया ४३ वर्षांपासून नियमित रक्तदान करणारे सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक बिपीन प्रभुदास निर्मळ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

World Blood Donor Day : ४३ वर्षांपासून नियमित रक्तदान करणारे बिपीन निर्मळ
औरंगाबाद : विज्ञानाने खूप प्रगती केली असली तरी अद्याप कृत्रिम रक्त तयार करण्याचे संशोधन होऊ शकलेले नाही. ते शक्यही नसल्याचे अनेक वेळा तज्ज्ञांच्या चर्चासत्रांतून निष्पन्न झाले आहे. म्हणूनच दुर्मिळ व सर्व प्रकारचे रक्तगट असलेले दाते समाजात अधिकाधिक तयार करून त्यांच्याकडून रक्तदान व्हावे, यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया ४३ वर्षांपासून नियमित रक्तदान करणारे सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक बिपीन प्रभुदास निर्मळ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
जागतिक रक्तदान दिनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानासह मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान जनजागृतीबाबतच्या कार्याचा आढावा त्यांनी मांडला. बिपीन निर्मळ म्हणाले, गत काही वर्षांत विज्ञानाने खूप प्रगती साधली आहे. अगदी कधी काळी अशक्यप्राय वाटणारी बाब म्हणजे अवयव प्रत्यारोपण. याच्या शस्त्रक्रिया आज सहजपणे औरंगाबाद शहरातील विविध रुग्णालयांत होत आहेत.
या प्रगतीमुळे मानवी जीवन सुकर होत असले तरी रक्ताबाबत अजून संशोधन सुरूच आहे. कृत्रिम रक्त तयार होऊ शकत नाही. ते केवळ माणसाच्या शरीरातच तयार होऊ शकते. म्हणूनच दुर्मिळच नव्हे तर सर्व प्रकारचे रक्तगट असलेले अधिकाधिक दाते तयार करण्याचा आपला संकल्प आहे. रक्तदानाचे प्रमाण वाढावे, रुग्णांना जीवनदान मिळावे यासाठी आपण मदर तेरेसा सोशल अॅण्ड मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या, महाविद्यालयांत जनजागृती करीत आहोत. या उपक्रमाला बऱ्यापैकी यश येत आहे.
ग्रामीण भागासह शहरातील स्लम भागातही लहान मुले आणि वृद्धांची आरोग्य तपासणी शिबीर घेतले जाते. आतापर्यंत २ हजार लोकांचे मरणोत्तर नेत्रदान आणि ८ नागरिकांचे मरणोत्तर देहदान करवून घेतले आहे. आपला ए पॉझिटिव्ह गु्रप असून, स्वत: १३६ वेळा रक्तदान आणि ६६ वेळा पांढऱ्या पेशी दान केलेल्या आहेत. त्यामुळे समाजात रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, देहदानाबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी, गैरसमज दूर व्हावे, यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे बिपीन निर्मळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.