कंपनीत लोखंडी बेल्टचा मार लागून कामगार ठार; चिखलठाणा एमआयडीसीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 19:02 IST2019-11-14T19:00:06+5:302019-11-14T19:02:35+5:30
चिकलठाणा एमआयडीसीतील आयसीएल कंपनीतील घटना

कंपनीत लोखंडी बेल्टचा मार लागून कामगार ठार; चिखलठाणा एमआयडीसीतील घटना
औरंगाबाद: काम करीत असताना लोखंडी बेल्टचा मार लागून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील आयसीएल कंपनीत १३नोव्हेंबर रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
सुभाष लक्ष्मण म्हस्के (२६,रा. धोंडखेडा,ता. औरंगाबाद)असे मृताचे नाव आहे. याविषयी एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, सुभाष हे चिकलठाणा एमआयडीसीतील आयसीएल कंपनीत कामगार होते. नेहमीप्रमाणे ते बुधवारी रात्रपाळीच्या कामासाठी कंपनीत आले होते. कंपनीत काम करीत असताना पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास लोखंडी बेल्टचा मार त्यांना लागला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. यानंतर सुभाष यांना बेशुद्धावस्थेत तेजसिंग कवाड आणि अन्य एकाने घाटी रुग्णालयात दाखल केले.अपघात विभागातील डॉक्टरांनी सुभाषला तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली.