महिलांचा ऐन दिवाळीतच वसमत नगरपालिकेवर घागर मोर्चा
By विजय पाटील | Updated: November 9, 2023 19:25 IST2023-11-09T18:48:25+5:302023-11-09T19:25:13+5:30
धरणात पाणी पण वसमतमध्ये टंचाई; वसमत शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे.

महिलांचा ऐन दिवाळीतच वसमत नगरपालिकेवर घागर मोर्चा
हिंगोली: वसमत शहरात मागच्या सहा-सात महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. कधी बारा दिवसाला तर कधी आठ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. त्यात कमीदाबाचा वीजपुरवठा निर्माण होत आहे. त्यामुळे विजेची अधिक भर त्यात पडली आहे. १० ते १५ दिवसांआड शहरात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांत रोष निर्माण होत आहे. गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान संतप्त महिलांनी पाण्यासह विविध मागण्यांसाठी नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.
वसमत शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यधिकारी अशुतोष चिंचाळकर यांनी महावितरण कार्यालयाला पत्र देऊन सिध्देश्वर येथील पंपहाऊला उच्चदाब विजपुरवठा देण्यासंदर्भात महावितरण कार्यालयाकडे मागणी केली आहे. त्या मागणीची अद्याप दखल घेतल्या गेली नाही. शहरातील ब्राह्मण गल्ली, भोसले गल्ली या भागात नळांना पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील संतप्त महिलांनी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वा नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून रोष व्यक्त केला. यासह अतिवृष्टीत गाव प्राचिन तलाव फुटला होता. अद्याप त्या तलावाची दुरुस्ती केली नसून तलावाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, गावात डासांचा प्रभाव वाढला असल्याने तापीच्या रुग्णांत वाढ होत आहे. त्यामुळे धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी करत मुख्याधिकारी चिंचाळकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, सुनील काळे, काशिनाथ भोसले यांच्यासह घागर मोर्चा घेऊन आलेल्या महिलांची उपस्थिती होती.
शहरातील पाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिध्देश्वर येथिल पंपहाऊला कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. चार दिवसांपूर्वी महावितरण कार्यालयाला पत्र देऊन उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करण्याची मागणी केली आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्न करत आहे.
- अशुतोष चिंचाळकर, मुख्यधिकारी, वसमत.