धारूर न.प.वर महिलांचा मोर्चा
By Admin | Updated: July 15, 2014 00:50 IST2014-07-14T23:15:30+5:302014-07-15T00:50:26+5:30
धारूर : शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे.

धारूर न.प.वर महिलांचा मोर्चा
धारूर : शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार मागणी करूनही नागरी सुविधांकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याने सोमवारी संतप्त महिलांनी पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चेकरी महिलांनी पालिकेविरोधात घोषणा दिल्याने परिसर दणाणला होता.
शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील हनुमानगल्ली येथील बोअर तब्बल सहा महिन्यांपासून वंद आहे. उन्हाळ्यातही वारंवार मागणी करूनही हा बोअर दुरूस्त न केल्याने महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. गांभिर्याची बाब म्हणजे या भागात पंधरा- पंधरा दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी अधिकच कष्ट सहन करावे लागत होते. काही नागरिकांना चक्क पाणी विकत घ्यावे लागत होते. या परिसरातील पाण्याची अशी बिकट अवस्था असतानाही पालिका बोअर दुरूस्त करीत नसल्याने महिलांमधून संताप व्यक्त केला जात होता.
यासह इतर भागात घंटागाडीही गेल्या काही दिवसांपासून फिरकत नाही. त्यामुळे महिलांना बऱ्याचवेळी कचरा कोठे टाकावा असा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी काही महिला आपल्या घरातील कचरा रस्त्यालगतच टाकतात. यामुळे अनेक वसाहतींमध्ये दुर्गंधीही पसरली आहे. रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यावर अनेकदा मोकाट गुरे ताव मारतात. यामुळे कचरा पूर्ण रस्त्यावरच विखुरला जातो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
स्वच्छतेसह इतर सुविधा पालिकेने पुरवाव्यात यासाठी १० जून २०१४ रोजी प्रभाग क्र.१ मधील जवळपास पन्नास ते साठ महिलांनी न.प.वर मोर्चा काढला होता. यावेळी महिलांनी पालिकेला समस्यांचे निवेदनही दिले होते. यावेळी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासनही महिलांना देण्यात आले होते. यानंतर महिना लोटला तरीही पालिकेने काहीच कारवाई केली नाही. यामुळे महिलांचा संताप अधिकच तीव्र झाला.
शहरातील नागरी समस्या सोडवाव्यात यासाठी पुन्हा सोमवारी महिलांनी तीव्र आंदोलन केले. मोर्चेकरी महिलांनी नगरपालिकेत सोमवारी सकाळपासूनच ठिय्या दिला. पालिकेच्यावतीने जोपर्यंत बंद असलेला बोअर दुरूस्त करण्यात येत नाही. तसेच घंटागाडी सुरू करावी, बंद पथदिवे दुरू करावेत, नळाला दररोज पाणी सोडावे यासह इतर मागण्या जोपर्यंत पालिका पूर्ण करीत नाही तोपर्यंत पालिकेतून उठणार नाही, अशी भूमिका मोर्चेकरी महिलांनी घेतली होती. यानंतर महिलांनी नगरपालिकेला निवेदन सादर केले. या आंदोलनात भाग्यश्रे धोत्रे, अंबिका गैवी, वृंदावनी धोत्रे, सविता कदम, सविता माने, आशाबाई धोत्रे, लता धोत्रे, शालन माने, लक्ष्मी गवळी, रेखा गवळी, आशा चव्हाण, कल्पना कापसे, शेख साबेरा, लैला शेख, स्वाती गोंदणे, शशिकला चिरके, वैशाली कापसे यांच्यासह दत्ताभाऊ धोत्रे, अॅड. मोहन भोसले, सुनील गैबी आदींची उपस्थिती होती. याबाबत प्रभारी मुख्याधिकारी कोकरे म्हणाले, तात्काळ बोअर, पथदिवे दुरूस्तीसह शहरात घंटागाड्या सुरू करूत. (वार्ताहर)
घंटागाडीअभावी कचऱ्याची समस्या
शहरातील प्रभाग क्र.१ मधील हनुमानगल्ली येथील बोअर सहा महिन्यांपासून आहे बंद.
शहरातील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने महिलांसह नागरिकांना रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे झाले मुश्कील.
पंधरा दिवसानंतर नळाला पाणी येत असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई.
काही नागरिकांना विकतच्या पाण्यावर भागवावी लागते आपली तहान.
घंटागाड्याही बंद असल्याने शहरात कचऱ्याची समस्या.
शहरात नागरी सुविधा पुरवाव्यात यासाठी महिनाभरापूर्वीही महिलांनी केले होते आंदोलन.
या आंदोलनाची पालिकेने दखल न घेतल्याने संतप्त महिलांनी सोमवारी पुन्हा पालिकेवर काढला मोर्चा.