धक्कादायक वास्तव! राज्यात दिवसाला ११४ महिला होतायेत बेपत्ता, सर्वाधिक १८ ते ३५ वयोगटातील
By सुमित डोळे | Updated: March 8, 2025 19:27 IST2025-03-08T19:26:38+5:302025-03-08T19:27:17+5:30
Women's Day Special: ८५.२ टक्के १८ ते ३५ वयोगटातील; कौटुंबिक छळ, ताणतणाव, प्रेम, गैरसंबंध प्रमुख कारणे, तपास मात्र संथगतीनेच

धक्कादायक वास्तव! राज्यात दिवसाला ११४ महिला होतायेत बेपत्ता, सर्वाधिक १८ ते ३५ वयोगटातील
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे महिलांचा आदर, सन्मानाच्या गप्पा होत असताना दुसरीकडे राज्यात ११४ ते १३० महिला रोज बेपत्ता होत आहेत. गतवर्षी ४१ हजार ७४० महिला बेपत्ता झाल्या. यात ८५.२% महिला या केवळ १८ ते ३५ वयोगटातील असल्याचे धक्कादायक सामाजिक वास्तव अहवालातून दिसतेय.
कौटुंबिक वाद, ताण-तणाव, प्रेम प्रकरण, विवाहबाह्य संबंधासारखी कारणे अनेक असली तरी महिलांचे बेपत्ता होणे व त्याच्या संथ तपासाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकदा तरुणी, महिलांना जाळ्यात ओढून वाममार्गाला लावले जात असल्याची शंका अनेकदा व्यक्त झाली. महिला दिनानिमित्त घेतलेल्या आढाव्यात गेल्या पाच वर्षांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये राज्यात ३०,००० च्या आसपास असलेले महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण २०२४ मध्ये ४१,७४० पर्यंत गेले. गतवर्षीच्या तुलनेत २०.२५% वाढ झाली आहे.
वयोगटानुसार बेपत्ता महिलांचे प्रमाण (२०२५)
वयोगट (वर्षे)- महिला -टक्केवारी (%)
१८-३५ -३५,५७०-८५.२%
३५-५० -३,९२८ -९.४%
५१-८० -२,०४० -४.९%
८० - २०८ - ०.५%
सहा वर्षांत २०.२५% ने
वर्षे - बेपत्ता महिला - टक्केवारी
२०१९ - ३५,९९० --
२०२० -३०,०८९ - (-१६.३९%)
२०२१ - ३४,७६३ - ( १५.५३%)
२०२२ - ३२,८०४ - (-५.६३%)
२०२३ - ३४,७०९ - ( ५.८०% )
२०२४ - ४१,७४० - (२०.२५%)
खंडपीठाने सुनावले होते
लहान मुले, महिला बेपत्ता होण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यांचा शोध घेणे, संरक्षण व आवश्यकेनुसार त्यांना सुरक्षित निवारा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्यातील विविध यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ऑगस्ट, २०२४ मध्ये व्यक्त केले होते.
गेली पळून म्हणून गांभीर्य नाही
पोलिस ठाण्यांमध्ये घर सोडून गेलेल्या महिला, तरुणींच्या तक्रारींचा गांभीर्याने तपास होत नाही. ठाण्याच्या पातळीवर तीन महिन्यांत मुलगी न सापडल्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपास वर्ग होतो. मात्र, तरीही अपुरे मनुष्यबळ, कमी साधनांमुळे तपास संथगतीने होतो. सापडून न आलेल्या महिला, मुलींचे काय होते, याचाही योग्य तपास होत नाही.